Marathi Compulsory Auto Taxi Driver: महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि ॲप कॅब चालकांना मराठी अनिवार्य; नियम मोडल्यास लायसन्स कायमचे रद्द!

‘महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६’ जारी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई:

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि ॲप आधारित कॅब (App-based Cabs) चालकांसाठी आता मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. चालकाला व्यवहारिक मराठी बोलता किंवा समजता येत नसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने त्याचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द (Permanent Cancellation of License) करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. या संदर्भातील ‘महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६’ (Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026) ची अधिसूचना जाहीर झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मराठी न आल्यास कशी होणार कारवाई?

नव्या नियमांनुसार, जर कोणत्याही रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठी भाषेचे जुजबी किंवा व्यवहारिक ज्ञान नसल्याचे आढळल्यास प्रशासनाकडून खालीलप्रमाणे पावले उचलली जातील:

  • १ महिन्याची नोटीस: संबंधित चालकाला मराठी शिकण्यासाठी सर्वप्रथम एक महिन्याची नोटीस दिली जाईल.
  • ३ महिन्यांसाठी लायसन्स निलंबन: नोटीस मिळूनही चालकाने मराठी न शिकल्यास किंवा नियमांचे पालन न केल्यास त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स/अधिकृतता ३ महिन्यांसाठी निलंबित (Suspended) केली जाईल.
  • कायमस्वरूपी रद्द: त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यास आणि मराठी शिकण्यास नकार दिल्यास चालकाचा परवाना कायमचा रद्द केला जाईल.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील महत्त्वाचे बदल:

परिवहन विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला विधी व न्याय विभागाने मंजुरी दिल्यानंतर हे सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत. यातील प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत:

  1. नियम ४ (उप-नियम ४): या नियमात सुधारणा करून ‘working knowledge of Marathi language’ या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. आता परवान्यासाठी अर्ज करणाऱ्याकडे मराठीचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  2. नियम २२ (३ए): ॲप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असणाऱ्या मोटार कॅब चालकांसाठी ही स्वतंत्र तरतूद आहे. नियम न पाळल्यास परवाना प्राधिकरणाला लायसन्स निलंबित किंवा रद्द करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
  3. नियम ७८ व नियम ८५: ही अट केवळ चालकांपुरती मर्यादित नसून परमिटधारक (Permit Holders) आणि परमिटचे नूतनीकरण (Permit Renewal) करणाऱ्यांसाठीही लागू राहील.

“मग्रुरी मोडून काढण्यासाठी कठोर पाऊल” – प्रताप सरनाईक

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “हा कायदा १९८९ मधीलच आहे, परंतु अधिकारी त्याची योग्य अंमलबजावणी करत नव्हते. आम्ही १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्यासाठी मुदत दिली होती. सरकारच्या आवाहनानंतर अनेक चालकांनी मराठी शिकली, मात्र काही चालक अजूनही ‘मराठी शिकणार नाही’ अशी मग्रुरीची भाषा वापरत आहेत. हीच मग्रुरी मोडून काढण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही नियमावलीत सुधारणा करून कायद्याचे कडक संरक्षण दिले आहे.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 12-08-2026