Gadchiroli Ashram School Snakebite: गडचिरोली सर्पदंश प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक पाऊल; संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द

निष्काळजी अधिकाऱ्यावरही निलंबनाची कारवाई


मुंबई:
गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू आणि तिघींवर सुरू असलेल्या उपचारांच्या दुर्देवी घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या घटनेचे पडसाद उमटले असून, मुख्यमंत्र्यांनी निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. शासकीय अनुदान घेऊनही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा न दिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, या आश्रमशाळेची पूर्वतपासणी करून सकारात्मक अहवाल देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

९ ऑगस्टच्या रात्री घडली दुर्देवी घटना
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत ९ ऑगस्टच्या रात्री सर्पदंश होऊन तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर अन्य तिघींवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडली. काँग्रेसचे माजी खासदार आणि तीन वेळा आमदार राहिलेले मारोतराव कोवासे यांच्याशी संबंधित संस्था ही आश्रमशाळा चालवत असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. राजकीय आणि सामाजिक अनुभव असलेल्या व्यक्तींच्या अनुदानित आश्रमशाळेत लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळ केला जात असेल आणि अक्षम्य चूक होत असेल तर त्यांना नक्कीच जाब विचारला पाहिजे, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

शिक्षकांचा अभाव आणि सुविधांचा तुटवडा; मुख्यमंत्र्यांचा तीव्र संताप
शासकीय अनुदान मिळूनही आश्रमशाळेत शिक्षक आणि वॉर्डन उपस्थित नसणे, तसेच आवश्यक सुविधांचा अभाव असणे यावर मुख्यमंत्र्यांनी कडक ताशेरे ओढले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी संस्थाचालकांवर आणि प्रशासकीय त्रुटींवर कठोर कारवाईचा बडगा उचलला.

नाशिक-पालघर भूकंप धक्क्यांवरही मंत्रिमंडळात चर्चा
मंत्रिमंडळाच्या या बैठकीत अलीकडच्या काळात नाशिक आणि पालघर परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांबाबतही सविस्तर चर्चा झाली. या भूगर्भीय घडामोडींचा अभ्यास ‘सेंटर फॉर सेस्मॉलॉजी’ (सेंटर फॉर सेस्मिस तंत्रज्ञान) मार्फत सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या अभ्यासासाठी अधिक चांगल्या संस्थांची मदत घेऊन सर्वंकष मूल्यमापन करण्याचे निर्देश दिले. तसेच या परिस्थितीबाबत नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये योग्य जनजागृती मोहीम राबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 12-08-2026