४३४ संस्थांची तपासणी, १३५ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर धडक कारवाई
मुंबई:
राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभारावर आणि अस्वच्छतेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कडक कारवाई केली आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० आणि ‘शेड्युल टी’ (Schedule T) मधील ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस’ (GMP) नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातील १० आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांचे परवाने एफडीएने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट निर्देशानंतर राज्यभरातील ४३४ परवानाधारक संस्थांची अचानक तपासणी मोहीम राबवून ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
४३४ संस्थांची तपासणी; १३५ कंपन्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील कारखान्यांमधील स्वच्छता, तांत्रिक मनुष्यबळ, गुणवत्ता नियंत्रण (Quality Control), चाचणी नोंदी (Testing Records), एसओपी (SOPs) आणि उत्पादनांच्या लेबल्सची कसून छाननी करण्यात आली. या तपासणीत गंभीर त्रुटी आढळलेल्या तब्बल १३५ आयुर्वेदिक उत्पादक संस्थांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
परवाने कायमस्वरूपी रद्द झालेल्या १० संस्थांची यादी:
१. मे. कृष्णा हर्बल – बारामती, पुणे
२. मे. लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स – करंजा, गोंदिया
३. मे. आदित्य फार्मा – वडेगाव, तिरोडा, गोंदिया
४. मे. अंगरस आयुर्वेद – वडेगाव, तिरोडा, गोंदिया
५. मे. कालिदास गांधी – पुणे
६. मे. शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी – सिन्नर, नाशिक
७. मे. इंडुकेअर फार्मा प्रा. लि. – जेजुरी एमआयडीसी, पुरंदर, पुणे
८. मे. हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर – अमरावती
९. मे. हिलॅरियस आयुर्वेद – एमआयडीसी मुंडीपार, गोंदिया
१०. मे. यशोदा लॅब प्रा. लि. – नाशिक रोड, नाशिक
तपासणीदरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटी:
- तांत्रिक व्यक्तींची गैरहजेरी: मान्यताप्राप्त तांत्रिक तज्ज्ञ हजर नसतानाही औषधांचे उत्पादन सर्रास सुरू होते.
- गुणवत्ता नियंत्रण आणि यंत्रांचा अभाव: अनेक कंपन्यांमध्ये गुणवत्ता नियंत्रण विभाग (Quality Control Department) नव्हता आणि औषध चाचणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नव्हती.
- अस्वच्छता व बोगस लेबल्स: उत्पादन परिसरात प्रचंड अस्वच्छता आढळली, तसेच औषधांच्या लेबलवर उत्पादनाच्या चुकीच्या तारखा (Manufacturing Dates) छापण्यात आल्या होत्या.
- नोंदीचा अभाव: कच्च्या व तयार मालाच्या चाचणीचे अभिलेख, मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी ठेवल्या नव्हत्या.
- भेसळीचा धोका: विविध औषधांचे घटक एकमेकांत मिसळू नयेत यासाठी आवश्यक कार्यपद्धतीचा (Cross-Contamination SOPs) पूर्णपणे अभाव दिसून आला.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि मानकांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही औषध उत्पादकाची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 12-08-2026














