BSNL Network Problem Sangameshwar: ताम्हाणे पंचक्रोशीत बीएसएनएल नेटवर्क सेवेचा लपंडाव!

  • टॉवर असूनही सेवा वारंवार खंडित; ग्राहकांना सहन करावा लागतोय आर्थिक भुर्दंड

BSNL Network Problem Sangameshwar अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे पंचक्रोशीत बीएसएनएल नेटवर्क सेवेचा लपंडाव सुरूच असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या भागात बीएसएनएलचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात सातत्याने नेटवर्क गायब होत असल्याने ‘टॉवर उभारून उपयोग काय?’ असा सवाल बीएसएनएलच्या ग्राहकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

साडवली आणि आसपासच्या ताम्हाणे पंचक्रोशीतील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची सेवा अत्यंत लहरी झाली आहे. वारंवार सेवा खंडित होत असल्यामुळे स्थानिक रहिवासी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

BSNL Network Problem Sangameshwar: दुसऱ्या कंपनीच्या सेवेवर विसंबून राहण्याची वेळ
बीएसएनएलची सेवा वारंवार ठप्प होत असल्याने या भागातील ग्राहकांना नाईलाजाने दुसऱ्या खाजगी कंपन्यांच्या नेटवर्क सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. खाजगी कंपन्यांचे महागडे रिचार्ज करावे लागत असल्याने नागरिकांना नाहक जादा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागात सरकारी दूरसंचार कंपनी असणाऱ्या बीएसएनएलवर नागरिकांचा मोठा विश्वास असतो, मात्र वारंवार निर्माण होणाऱ्या या तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे बीएसएनएल प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ताम्हाणे पंचक्रोशीतील नेटवर्क यंत्रणा पूर्ववत व सुरळीत करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 15-08-2026