शृंगारतळी, गुहागर चौपाटी येथील व्यावसायिकांची तपासणी; नोंदणी करण्याचे अन्न सुरक्षा विभागाचे आवाहन
Guhagar FDA Action News अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शृंगारतळी येथील एका विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या चिकन सेंटरवर मोठी कारवाई केली. संबंधित चिकन सेंटरकडे अन्न सुरक्षेचा आवश्यक परवाना नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याने अधिकारी परदेशी यांनी दंडात्मक कारवाई करत व्यवसाय तात्काळ बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी परदेशी व त्यांच्या पथकाने गुहागर चौपाटीवरील स्नॅक्स सेंटर तसेच इतर छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही कसून तपासणी केली. व्यवसाय करताना पाळावयाचे स्वच्छतेचे निकष आणि अन्न सुरक्षेचे नियम विक्रेत्यांना समजावून सांगण्यात आले. याशिवाय गुहागर शहरातील एका नामांकित हॉटेलचीही अन्न सुरक्षा मानांकनानुसार सखोल तपासणी करण्यात आली.
Guhaagar FDA Action News: व्यावसायिकांना अन्न सुरक्षा नोंदणीचे प्रशासकीय आवाहन
अन्न व औषध प्रशासनाकडून गुहागर तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या अन्न व्यावसायिकांना अधिकृत परवाने घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या व्यावसायिकांनी अद्याप आपली नोंदणी केलेली नाही किंवा परवाना घेतलेला नाही, त्यांनी पुढील दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तत्काळ आपली अधिकृत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या गुहागर आणि शृंगारतळी परिसरात खाद्यपदार्थांचा दर्जा आणि स्वच्छता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून आगामी काळातही अशीच धडक तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 15-08-2026














