रत्नागिरीत जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव उत्साहात; पाककला व रील स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा
Ratnagiri Wild Vegetable Festival News अंतर्गत रानभाज्यांचे औषधी व पौष्टिक गुणधर्म लक्षात घेता, त्या केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित राहू नयेत. त्यांचा वापर वर्षभर करता येण्याच्या दृष्टीने प्रक्रिया करण्यावर कृषी विद्यापीठांनी संशोधन करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
रत्नागिरीत कृषी विभाग आणि ‘आत्मा’ (ATMA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाच्या निमित्ताने रानभाज्या आणि तृणधान्यांच्या विविध पाककृती स्पर्धा तसेच रील स्पर्धांचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, रानभाज्यांचा व्यावसायिक उपयोग होण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची गरज आहे. पावसाळ्यात केवळ दोन-अडीच महिने मिळणाऱ्या या भाज्यांचे महिला बचत गटांच्या माध्यमातून आठवडाभर उपाहारगृह चालवून विक्रीचे प्रयोग करावेत. यामुळे महिलांना मोठा व्यावसायिक लाभ होईल आणि अशा उपक्रमांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
Ratnagiri Wild Vegetable Festival News: मान्यवरांकडून स्टॉल्सची पाहणी; पाककला व रील स्पर्धेचे विजेते
या सोहळ्यास जिल्हाधिकारी मनुज जिंदल, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, आमदार किरण सामंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आणि ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बेतिवार उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी गावागावातून शेतकरी व महिलांनी लावलेल्या रानभाजी स्टॉल्सना भेट देऊन पदार्थांची चव चाखली. गुरुवर्य रा. पु. जोग संजीवन गुरुकुलच्या शाळकरी विद्यार्थ्यांचा स्टॉल या महोत्सवात विशेष लक्षवेधी ठरला.
महोत्सवात आयोजित विविध स्पर्धांचे विजेते खालीलप्रमाणे आहेत:
१. रानभाजी पाककला स्पर्धा:
- प्रथम क्रमांक: संयुक्ता विशाल मोरे (नरवण, ता. गुहागर) – पदार्थ: वाफवलेला थ्री लेअर रानपिझ्झा
- द्वितीय क्रमांक: स्वप्नाली संजय भागवत (लांजा) – पदार्थ: रानभाजी नूडल्स व लाडू
- तृतीय क्रमांक: सौ. प्रज्ञा जयंत फडके (जांभूळआड, रत्नागिरी) – पदार्थ: राणदात्री
२. पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा:
- प्रथम क्रमांक: वैशाली श्रीपाद देवदास (रत्नागिरी) – पदार्थ: बाजरीची पौष्टिक खिचडी
- द्वितीय क्रमांक: सौ. साक्षी सम्राट पाटील (रत्नागिरी) – पदार्थ: पौष्टिक फालुदा
- तृतीय क्रमांक: स्वाती सुनील पारकर (रत्नागिरी) – पदार्थ: प्रोटीनयुक्त नाचणी लाडू
३. रील स्पर्धा विजेते:
१. निकिता संदीप नाचणेकर (कोदवली, ता. राजापूर)
२. उल्का पटवर्धन (नाचणे, रत्नागिरी)
३. साहिल राजेंद्र सकपाळ (खेड)
(उत्तेजनार्थ: वैभव आमरे – राजापूर, अनुष्का मोहिते – खेड)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:17 15-08-2026














