MahaWalkathon Walk For Water 2026: 21 ऑगस्टला राज्यभर ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन; जलसंवर्धनासाठी नागरिकांना आवाहान

मृद् व जलसंधारण विभागाचा पुढाकार; ३ किमी चालणे आणि शपथेसह ई-प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह मिळवण्याची संधी

रत्नागिरी:

MahaWalkathon Walk For Water 2026 उपक्रमाअंतर्गत येत्या २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनाचे औचित्य साधून राज्यभरात ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ (MahaWalkathon – Walk For Water) चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत विकासासाठी मृद् व जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी राज्य शासनाच्या मृद् व जलसंधारण विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.

संकल्पना व घोषवाक्य

  • संकल्पना: ‘सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो’ (Save Soil, Save Water, Secure Tomorrow)
  • घोषवाक्य: ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’
  • स्वरूप: २१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल ३ किलोमीटर चालणे आणि मृद् व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेणे.

जलसंधारण दिन, सप्ताह आणि अभियान

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो.

  • जलसंधारण सप्ताह: १५ ते २१ ऑगस्ट
  • जलसंधारण अभियान: १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी २०२७

मृद् व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आयोजन

राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम मुंबईत पार पडणार असून, प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या नियोजनाचे प्रमुख म्हणून जिल्हास्तरीय मृद् व जलसंधारण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जबाबदारी सांभाळतील.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, व्यापारी संघटना व सर्वसामान्य नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

ऑनलाइन नोंदणी, प्रमाणपत्र व बक्षीसे

सोशल मीडिया हॅशटॅग: या लोकचळवळीच्या प्रसारासाठी #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

QR आधारित नोंदणी: महावॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी QR कोडद्वारे ऑनलाइन नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ई-प्रमाणपत्र: २१ ऑगस्ट रोजी सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अधिकृत ई-प्रमाणपत्र (E-Certificate) दिले जाईल.

जिल्हास्तरीय विजेते: प्रत्येक जिल्ह्यात पहिल्या १० विजेत्यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवले जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:15 17-08-2026