रंगकर्मींसाठी नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांची मोठी घोषणा; नगरपालिकेचे हॉल अल्प दरात मिळणार
रत्नागिरी: Marathi Abhivachan Spardha Ratnagiri या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अभिवाचन स्पर्धेचा पटवर्धन हायस्कूलमधील कॅप्टन ठाकूर सभागृहात दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी दिमाखात पडदा पडला. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या ३६ संघांच्या सहभागाने सलग १२ तास रंगलेल्या या स्पर्धेत वरवडे येथील ‘कलारंग नाट्य प्रतिष्ठान’ने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. दीपप्रज्वलन, नटराज पूजन आणि ज्येष्ठ रंगकर्मी तसेच नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटन सोहळा आणि प्रमुख उपस्थिती
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री विनायक हातखंबकर सर, नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांच्यासह परीक्षक संजय बोरकर आणि राजेंद्र कुमार घाग यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे नेटके सूत्रसंचालन नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्री वामन कदम यांनी केले.
रंगकर्मींसाठी नगराध्यक्षांची मोठी घोषणा
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रत्नागिरीच्या नगराध्यक्ष सन्माननीय शिल्पाताई सुर्वे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रत्नागिरीतील नाट्य संघांना तालीम आणि सरावासाठी भेडसावणारी जागेची अडचण लक्षात घेऊन नगराध्यक्षा सुर्वे यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. नगरपरिषदेच्या मालकीचे शहरातील विविध हॉल आणि ॲक्टिव्हिटी सेंटर्स राज्य नाट्य स्पर्धेतील संघांना अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिले जातील, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
सांघिक पारितोषिके:
- प्रथम क्रमांक: कलारंग नाट्य प्रतिष्ठान, वरवडे
- द्वितीय क्रमांक: अनन्या एंटरटेनमेंट, जांभरुण
- तृतीय क्रमांक: गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
- उत्तेजनार्थ: श्रद्धा मयेकर आणि टीम
वैयक्तिक पारितोषिके:
- प्रथम क्रमांक: सौ. पूजा जोशी
- द्वितीय क्रमांक: सौ. मधुरा लाकडे
- तृतीय क्रमांक: श्री. योगेश चव्हाण
- उत्तेजनार्थ: श्रीमती रसिका सहस्रबुद्धे
उत्कृष्ट नियोजनाचे सर्वत्र कौतुक
सलग १२ तास चाललेल्या या व्यापक स्पर्धेचे नियोजन श्री अनिल दांडेकर, सौ. अनुया बाम, श्री श्रीकांत पाटील आणि ॲड. श्री श्रीकांत भाटवडेकर यांच्या चमूने अत्यंत शिस्तबद्धरीत्या केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संपूर्ण कार्यकारिणीने स्पर्धेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री सुनील बेंडखळे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 17-08-2026














