पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी विदेशातून आणलेले निळे फूल ठरले विशेष आकर्षण; प्रशासन व देवस्थान समितीचे चोख नियोजन
वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर), कोल्हापूर:
Jyotiba Yatra 2026 (श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रा): दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे पार पडलेल्या वार्षिक श्रावण षष्ठी यात्रेला यंदा देशभरातून आलेल्या भाविकांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या यात्रेत गाभारा दर्शन, शिखराचे दर्शन आणि मंदिर परिसरातून दर्शन घेणाऱ्या भाविकांची मिळून सुमारे २ लाख भाविकांनी उपस्थिती लावल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
विदेशी निळे फूल ठरले यात्रेचे मुख्य आकर्षण
यंदाच्या श्रावण षष्ठी यात्रेमध्ये पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी विशेषतः विदेशातून मागवलेले निळे फूल भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. श्री ज्योतिबाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या या अनोख्या निळ्या फुलाने मंदिर परिसरात उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले. या फुलामुळे यात्रेच्या धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात एक विशेष शोभा आणि उत्साह भरला होता.
Jyotiba Yatra 2026: १ लाखाहून अधिक भाविकांची अधिकृत नोंद, एकूण उपस्थिती २ लाखांवर
देवस्थान समितीने दिलेल्या आकडेवारीनुसार, यात्रेत प्रत्यक्ष गाभारात जाऊन दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या ३७ हजार १२७ इतकी होती. तर मंदिर परिसर व शिखराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची अंदाजित संख्या ७४ हजार ९२० नोंदवली गेली. यानुसार अधिकृत नोंद झालेली एकूण भाविक संख्या १ लाख १२ हजार ४७ आहे. याशिवाय गाभाऱ्याबाहेरून मुखदर्शन घेणारे आणि डोंगर परिसरात उपस्थित असणाऱ्या इतर भाविकांचा विचार करता एकूण उपस्थिती २ लाखांच्या पार पोहोचली होती.
प्रशासन आणि देवस्थान समितीचे चोख व्यवस्थापन
भाविकांच्या अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर दर्शन व्यवस्था, गर्दी नियंत्रण, सुरक्षा, वाहतूक कोंडी रोखणे, स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि प्रथमोपचारासाठी प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने व्यापक नियोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी तथा प्रशासक डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यात्रेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांनी पोलीस प्रशासन व इतर शासकीय विभागांमध्ये समन्वय साधून व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले. तसेच ऑफिस इनचार्ज धैर्यशील तिवले यांनी प्रत्यक्ष व्यवस्थापनाची धुरा सांभाळली.
विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान
यात्रेचे व्यवस्थापन सुरळीत पार पाडण्यात प्रांत अधिकारी समीर शिंगटे, पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी जाधव शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. जे. पाचपुते यांच्यासह विविध शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
लाखो भाविकांची उपस्थिती असतानाही पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त नियोजनामुळे यात्रा अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडली. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व भाविक, स्वयंसेवक, पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे देवस्थान समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 19-08-2026














