Maharashtra Voter List Update: कोकण आणि मुंबईतून ६७ लाख मतदार यादीतून वगळणार; मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात मोठी कारवाई

रत्नागिरीत १ लाख ६० हजार तर ठाण्यात १६ लाख मतदार प्रक्रियेबाहेर; बोगस मतदानावर टाच आणण्यासाठी निवडणूक आयोगाचा इशारा

ठाणे:

Maharashtra Voter List Update (महाराष्ट्र मतदार यादी पुनरीक्षण): देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात (SISR) महाराष्ट्रात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. राज्यातील सुमारे ७७.७७ टक्के मतदारांचे डिजिटल काम पूर्ण झाले असले, तरी अद्यापही राज्यातील तब्बल १ कोटी ८० लाख ६० हजार ६९७ मतदार या प्रक्रियेबाहेर राहण्याची शक्यता आहे. यापैकी एकट्या कोकण विभागासह मुंबईतून ६७ लाखांच्या घरात मतदार यादीतून वगळले जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Voter List Update: कोकणातील जिल्हाहाय वगळल्या गेलेल्या मतदारांची आकडेवारी

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, कोकणातील सर्वाधिक मोठा जिल्हा असलेल्या ठाण्यामध्ये तब्बल १६ लाख मतदार यादी प्रक्रियेबाहेर गेले आहेत. त्याखालोखाल पालघरमध्ये ६ लाख मतदार आणि रायगड जिल्ह्यात जवळपास ५ लाख ८४ हजार मतदार या यादीतून बाहेर पडले आहेत.

कोकण किनारपट्टीवरील दक्षिण जिल्ह्यांचा विचार केल्यास, सिंधुदुर्गात सुमारे १ लाख मतदार तर रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याशिवाय मुंबई शहर व उपनगरातून ३७ लाख मतदार या प्रक्रियेतून बाहेर गेले आहेत.

डिजिटायझेशन आणि फॉर्म न भरल्याने कारवाई

राज्यात १८ जून २०२६ पर्यंत एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९४ मतदार नोंदणीकृत होते. यापैकी ७ कोटी ६० लाख ९८ हजार १५३ मतदारांचे स्वाक्षरीसह गणना प्रपत्र गोळा करून त्यांचे डिजिटायझेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित १८.४६ टक्के म्हणजेच १ कोटी ८० लाख ६० हजार ६९७ मतदारांची गणना प्रपत्रे अद्याप जमा झालेली नाहीत.

या प्रक्रियेबाहेर राहिलेल्या संवर्गात प्रामुख्याने गैरहजर (Absentee), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) आणि दुबार (Duplicate) मतदारांचा (ASD/ASDD) समावेश आहे. नागरी भागांमध्ये विशेषतः ठाणे, नागपूर, मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत मतदारांची अनास्था अधिक दिसून आली आहे.

‘ते’ मतदार प्रक्रियेबाहेर राहतील: निवडणूक आयोगाचे निर्देश

कोणताही पात्र मतदार यादीतून वंचित राहू नये म्हणून या ASD/ASDD यादीतील मतदारांची योग्य रीतीने पडताळणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी मतदान केंद्र अधिकारी (BLO) राजकीय पक्षांच्या केंद्रस्तरीय प्रतिनिधींसोबत (BLA) संयुक्त बैठक घेऊन मतदारांच्या घरी भेट देणार आहेत. जे मतदार घरी गेल्यानंतर गणना प्रपत्र स्वीकारण्यास किंवा त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार देतील, त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

नवीन नोंदणीसाठी १६ सप्टेंबरपर्यंत संधी अन् महत्त्वाच्या तारखा

ज्या मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत, त्यांना १७ ऑगस्ट २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, आता नवीन मतदार नोंदणीची मुदत १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर अशी वाढवण्यात आली असल्याने वगळलेल्या मतदारांना नव्याने नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

  • प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: २४ ऑगस्ट २०२६
  • दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी: २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६
  • प्राप्त दाव्यांचा निकाल: २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६
  • अंतिम मतदार यादी प्रसिद्धी: २७ ऑक्टोबर २०२६

बोगस मतदानावर कडक कारवाईचा इशरा

या यादी पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाने बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी कठोर इशारा दिला आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम १७ व १८ मधील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदवता येत नाही. जर कोणी मतदार यादीच्या पुनरीक्षणादरम्यान किंवा नाव नोंदणी करताना चुकीचे विधान अथवा खोटी घोषणा करताना आढळल्यास, कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 19-08-2026