Lanja Dumping Ground: लांजा कोत्रेवाडीतील डम्पिंग ग्राउंडप्रश्नी फेरतपासणी करून मार्ग काढणार; उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे यांचे आश्वासन

ग्रामस्थांच्या लाक्षणिक उपोषणाची प्रशासनाकडून दखल; सकारात्मक चर्चेनंतर उपोषण मागे

लांजा:

Lanja Dumping Ground News (लांजा): लांजा शहरातील कोत्रेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड आणि स्थानिक प्रशासनाविरोधात कोग्रेवाडी ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण छेडले होते. या आंदोलनाची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे यांनी लांजा येथे प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्या ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा केली. प्रकरणाची फेरतपासणी करून योग्य मार्ग काढू, असे ठोस आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले लाक्षणिक उपोषण मागे घेतले.

तहसीलदार अन् मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थांची नाराजी

लांजा नगरपंचायतीकडून वस्तीजवळ उभारण्यात येत असलेला घनकचरा प्रकल्प रद्द करण्यासाठी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आंदोलन सुरू असताना स्थानिक तहसीलदार आणि लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट न घेतल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Lanja Dumping Ground News: डम्पिंग ग्राउंड रद्द करण्याची ठाम मागणी

प्रसारमाध्यमांशी बोलताना कोग्रेवाडी ग्रामस्थांनी सांगितले की, यापूर्वी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत दोन महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.

  • कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंडचा प्रस्ताव लांजा नगरपंचायत कार्यकारिणीने ठरावाने रद्द करून तो प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा.
  • प्रकल्पाच्या प्रक्रियेत झालेल्या आर्थिक बाबींची रिकव्हरी (वसुली) लावावी.

मात्र, या मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.

स्वातंत्र्यदिनी सुरू झालेले उपोषण चर्चेनंतर स्थगित

शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर लांजा शहरात ग्रामस्थांच्या उपोषणाला सुरुवात झाली होती. या आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उपोषणाच्या सुरुवातीला प्रशासनाचा एकही प्रतिनिधी घटनास्थळी आला नव्हता, मात्र नंतर उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे यांनी उपोषणस्थळी धाव घेऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. फेरतपासणीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी, आता प्रशासन याप्रश्नी काय निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 19-08-2026