खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर टोलेबाजी; भरत गोगावले व गिरीश महाजनांच्या पालकमंत्रीपदावरही डागली तोफ
चिपळूण / मुंबई:
Bhaskar Jadhav on Rahul Narwekar (भास्कर जाधव यांची राहुल नार्वेकरांवर टीका): सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. यावर नार्वेकरांनी ‘माझा निर्णय शाश्वत आहे’ असे प्रत्युत्तर दिल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राहुल नार्वेकरांवर जोरदार पलटवार केला आहे. “राहुल नार्वेकर यांना आपण विधानसभेचे अध्यक्ष आहोत याचे भान राहिलेले नाही,” अशा तीव्र शब्दांत जाधवांनी नार्वेकरांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.
विधानसभा अध्यक्ष पक्षातीत असावा; नार्वेकरांवर सडकून टीका
प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “विधानसभेचा अध्यक्ष हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो, त्याची भूमिका पूर्णपणे पक्षाविरहीत असली पाहिजे. परंतु, राहुल नार्वेकर यांच्यासारख्या व्यक्तीकडून अशा तटस्थतेची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.”
उल्लेखनीय म्हणजे, नार्वेकरांनी सिब्बलांचे सर्व दावे बिनबुडाचे असल्याचे सांगत, आपला निर्णय न्यायालयाच्या निकषांनुसार आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच घेतल्याचा दावा केला होता.
Bhaskar Jadhav on Rahul Narwekar: महामार्गावरील खड्डे अन् पालकमंत्र्यांवर राजकीय टोलेबाजी
विधानसभा अध्यक्षांव्यतिरिक्त भास्कर जाधव यांनी राज्य सरकार, रस्त्यांची दुरवस्था आणि पालकमंत्र्यांच्या निवडीवरून महायुती सरकारला धारेवर धरले:
गिरीश महाजन व भरत गोगावले यांच्यावर टीका: कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचाराचे बक्षीस म्हणून गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री केले असावे, तर मुंबई-गोवा महामार्गावर नाशिकपेक्षा अधिक खड्डे पाडण्यासाठी भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद दिले असावे, अशी जहरी टीका जाधवांनी केली.
रस्ते की खड्डे? “माझ्या मतदारसंघात १० वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यांवर आज एकही खड्डा नाही. मात्र, सध्याच्या सरकारच्या काळात रस्ता कुठे आणि खड्डे कुठे, असा प्रश्न पडतो,” असा घणाघात त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांवर निशाणा: “मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे पालक असतात. मात्र, ते आपल्या पक्षातील नेत्यांचे निर्णय बदलत नाहीत, पण दोन्ही मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय सर्रास बदलत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 19-08-2026














