दोन्ही शिवसेनेतील आमदार-खासदार फुटण्याची शक्यता; निवडणूक आयोगाच्या अधिकारांवरही उपस्थित केले कायदेशीर प्रश्न
मुंबई:
Prakash Ambedkar Shiv Sena Symbol Case संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून चिन्ह गोठवण्याची (Freeze) मागणी करण्यात आली आहे. मात्र, जर कोर्टाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले, तर त्याचा थेट राजकीय फायदा भाजपलाच होईल, असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
आमदार-खासदार भाजपकडे जाण्याची शक्यता
माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोर्टाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेल्यास दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावे लागेल. अशा परिस्थितीत ‘धनुष्यबाण’ हे मूळ चिन्हच उपलब्ध नसल्यास दोन्ही गटांकडे असलेले आमदार आणि खासदार त्यांच्याकडे टिकून राहतील का? हा मोठा प्रश्न आहे. या परिस्थितीचा फायदा अमित शाह आणि भाजप घेऊ शकतात. चिन्ह गोठवल्यानंतर हे लोकप्रतिनिधी भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोर्टाचा निर्णय कोणाच्याही बाजूने लागला, तरी अंतिम फायदा भाजपचाच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा फोडाफोडीचे राजकारण?
आंबेडकर यांनी असाही इशारा दिला की, न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा आमदार आणि खासदारांची मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी पाहायला मिळू शकते.
निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर कायदेशीर प्रश्न
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कायदेशीर मुद्द्यां आधारे ताशेरे ओढले:
- सादिक अली खटल्याचा संदर्भ: १९८९ पूर्वी राजकीय पक्ष केवळ एक असोसिएशन म्हणून कार्यरत होते, त्यामुळे सादिक अली खटल्यावेळी निवडणूक आयोगाला निर्णय देण्याचा अधिकार होता.
- कलम २९ (अ) ची दुरुस्ती: १९८९ मध्ये लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती करून कलम २९ (अ) समाविष्ट करण्यात आले, ज्यामुळे राजकीय पक्षांना कायदेशीर अस्तित्व मिळाले.
- नागरी न्यायालयांचे अधिकार क्षेत्र: राजकीय पक्षांमधील अंतर्गत वाद सोडवण्याचा अधिकार नागरी न्यायालयांना (Civil Courts) आहे, निवडणूक आयोगाला नाही. आयोगाला नागरी अधिकार क्षेत्र नसतानाही असे निर्णय देणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही, असा दावा त्यांनी केला.
Prakash Ambedkar Shiv Sena Symbol Case: महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चा
प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानामुळे शिवसेना चिन्ह वादातील कायदेशीर लढाईसोबतच तिच्या राजकीय परिणामांवरही आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:07 20-08-2026














