देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली प्रवेशावर वक्तव्य; कुंभमेळ्याचा ‘सायंटिफिक प्रोजेक्ट रिपोर्ट’ जाहीर करण्याची मागणी
Prithviraj Chavan MVA & Kumbh Mela Budget Allegations प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनसनाटी राजकीय दावा केला आहे. डिसेंबर २०१४ मध्येच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता, मात्र तो प्रस्ताव मी तिथल्या तिथे फेटाळून लावला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
- २०१४ मधील मविआ प्रस्ताव: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युती सरकारचा प्रस्ताव आला होता, परंतु काँग्रेस पक्षाच्या धोरणानुसार शिवसेनेसोबत जाणे शक्य नसल्याने तो फेटाळला होता. पुढे २०१९ मध्ये परिस्थिती बदलल्यानंतर मीच मविआचा प्रस्ताव मांडला, असा दावा चव्हाण यांनी केला.
- फडणवीसांच्या दिल्ली प्रवेशावर भाष्य: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांवर बोलताना चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रातील व्यक्ती दिल्लीत जात असेल तर ती बढतीच मानली जाईल, पण ही बढती आम्हाला मान्य नाही.
- नाशिक कुंभमेळा ३५ हजार कोटींचे बजेट: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेले ३५ हजार कोटींचे बजेट अत्यंत धक्कादायक आहे. गेल्यावेळी ३ ते ३.५ हजार कोटी खर्च झाले होते, मग आता हा खर्च १० पटीने कसा वाढला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
- प्रोजेक्ट रिपोर्ट व पर्यावरणाचा प्रश्न: ६ कोटी भाविक येतील असा दावा सरकार करत असले, तरी फक्त ४० लाख लोक आले तर काय? या योजनेचा कोणताही सायंटिफिक प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा ‘लोड कॅरिंग कॅपेसिटी’चा अभ्यास झालेला नाही. हा फक्त टेंडर काढून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा प्रकार आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
- महामार्ग विकास व इतर निधी: समृद्धी महामार्गावर सुविधा अपूर्ण राहिल्याचा उल्लेख करत १ लाख कोटींच्या शक्तीपीठ महामार्गावरही त्यांनी टीका केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामार्फत कुंभमेळ्याचा अधिकृत प्रोजेक्ट रिपोर्ट मागवून विधानसभेत व सार्वजनिक व्यासपीठावर उघड चर्चा घडवून आणू, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 21-08-2026














