गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात ५ टक्क्यांची घट; ३६ धरणे १०० टक्के भरली
Maharashtra Dam Water Stock बाबतच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी विभागनिहाय पाहणी करता साठ्यामध्ये मोठी विषमता दिसून येत आहे. सध्या राज्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांमध्ये मिळून ३८,०७७.६० दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत राज्यातील धरणांमध्ये ७९.०८ टक्के साठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदाचा एकूण साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे.
विभागनिहाय पाणीसाठ्याची आकडेवारी:
- कोकण विभाग: सर्वाधिक ८९.५३ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला असून कोकण अग्रस्थानी आहे.
- पुणे विभाग: पुणे विभागात ८७.९४ टक्के साठा असून समाधानकारक स्थिती आहे.
- नाशिक विभाग: नाशिक विभागातील धरणांमध्ये ७७.५३ टक्के उपयुक्त साठा जमा झाला आहे.
- अमरावती विभाग: विदर्भातील अमरावती विभागात ६१.९५ टक्के साठा आहे.
- नागपूर विभाग: नागपूर विभागात ५९.७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
- छत्रपती संभाजीनगर विभाग (मराठवाडा): मराठवाड्यात स्थिती अत्यंत चिंताजनक असून येथे अवघा ४९.८७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच सुमारास छत्रपती संभाजीनगर विभागात ६९.०३ टक्के साठा होता.
३६ धरणे पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लो
सततच्या पावसामुळे राज्यातील तब्बल ३६ धरणे १०० टक्के भरली असून त्यांच्यातून विसर्ग सुरू आहे. इतर धरणांमध्ये सध्या ५ ते ९५ टक्क्यांच्या दरम्यान साठा आहे. राज्याची सरासरी स्थिती समाधानकारक वाटत असली, तरी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत अजूनही मोठ्या पावसाची गरज भासत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 21-08-2026














