रत्नागिरी शहर पोलिसांत भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी :
रत्नागिरीतील तेलीआळी परिसरामध्ये राहणाऱ्या एका ६५ वर्षीय सेवानिवृत्त महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ आणि मनी लाँड्रिंगच्या गंभीर कारवाईची भीती दाखवून तब्बल ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मोठ्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी सायबर भामट्यांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
देशविरोधी कारवाईचे नाव सांगून भीतीचा खेळ रत्नागिरीतील शिवनेरी निवासस्थानी राहणाऱ्या मधूश्री विलास पुनसकर या ६५ वर्षीय सेवानिवृत्त महिला आहेत. १३ ऑगस्ट २०२६ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत त्यांना अज्ञात सायबर भामट्यांचे दूरध्वनी आले. फोन करणाऱ्यांनी स्वतःची ओळख ‘मिनिस्ट्री ऑफ इंडिया’मधून बोलत असल्याचे सांगून नीरज कुमार आणि प्रदीप जयसवाल अशी करून दिली. फिर्यादी महिलेच्या नावावरील आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरून अनेक देशविरोधी कारवायांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्याची खोटी माहिती त्यांनी दिली. तसेच पोलीस विभागाकडून तात्काळ अटकेची कारवाई केली जाईल, अशी तीव्र भीती त्यांच्या मनात निर्माण केली.
पडताळणीच्या नावाखाली कोट्यवधींचा अपहार या प्रकरणातून आणि संभाव्य अटकेपासून सुटका हवी असल्यास, फिर्यादी व त्यांच्या पतीच्या नावावर असणाऱ्या सर्व बँक ठेवी मनी लाँड्रिंगमधील आहेत की नाही याची कायदेशीर पडताळणी करावी लागेल, असा बनाव भामट्यांनी रचला. ही सर्व तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रक्कम खात्यावर परत केली जाईल असा विश्वास देऊन, सायबर गुन्हेगारांनी टप्प्याटप्प्याने तब्बल ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपये उकळले. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तपासाला गती या घटनेनंतर मधूश्री पुनसकर यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांक धारक भामट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) २००० च्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सायबर गुन्ह्याचा अधिक तपास वेगाने सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 24-08-2026














