Rahul Gandhi : महिलांवरील वाढते अत्याचार आणि विषमता ही देशाची खरी शोकांतिका; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“मनुस्मृतीची विचारसरणी महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेते”; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात रोखठोक वक्तव्य

पुणे :

“महिला ही या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. मात्र, दुर्दैवाने महिलांनी कधीही स्वतंत्र राहू नये, ही मनुस्मृतीची जुनीच विचारसरणी आजही राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा घणाघाती हल्ला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ (Chhatron Ki Goonj) या विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. “महिलांवर कोणत्याही पुरुषाचा किंवा विशिष्ट चौकटीचा अधिकार नाही,” असे सांगत त्यांनी देशातील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आर्थिक विषमतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

“पिंजरा तोडा” संकल्पनेवर विद्यार्थिनींशी थेट संवाद ‘पिंजरा तोडा’ या संकल्पनेवर आधारित आयोजित या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी राजकीय भाषणाऐवजी उपस्थित विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला. पुण्याचे वर्णन ‘प्रेम’ असे करत त्यांनी सांगितले की, “मी इथे कोणतेही राजकारण करायला आलो नाही, तर तुमच्या भावना ऐकायला आलो आहे.” यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी शिक्षण, नोकरी आणि रोजच्या प्रवासादरम्यान महिलांना येणाऱ्या अडचणी राहुल गांधींसमोर मांडल्या. आजही सार्वजनिक ठिकाणी वावरताना आणि शिक्षण घेताना मुलींना मोठ्या प्रमाणावर सामाजिक बंधने व भेदभावाचा सामना करावा लागतो, अशी व्यथा विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.

शिक्षणातील भेदभाव आणि आर्थिक हिंसाचारावर भाष्य संवादादरम्यान राहुल गांधी यांनी देशातील महिलांच्या सद्यस्थितीवर विदारक आकडेवारी मांडली. ते म्हणाले, “शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत प्रत्येक ठिकाणी मुलींसोबत भेदभाव केला जात आहे. आज देशात काम करणाऱ्या ८४ टक्के महिलांना कामावर जाण्यासाठी घरातील पुरुषांची परवानगी घ्यावी लागते. इतकेच नव्हे तर पुरुषांच्या तुलनेत महिलांना तब्बल २५ टक्के कमी पगार दिला जातो, हा एक प्रकारचा आर्थिक हिंसाचार आहे.”

देशात साडेचार लाख स्त्रीभ्रूणहत्या; सुरक्षेचा गंभीर प्रश्न देशातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर बोट ठेवत राहुल गांधी म्हणाले, “भारतात १०० पैकी ६ महिलांवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अत्याचार होत आहेत आणि दरवर्षी तब्बल साडेचार लाख स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत. ७० कोटी लोकांची स्वप्ने आणि विचार हीच भारताची खरी ताकद आहे, त्यामुळे या देशातील महिला स्वतंत्र असणे आणि त्यांना समान सन्मान मिळणे अत्यंत आवश्यक आहे.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 24-08-2026