Maharashtra School Education: शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

शाळांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी शाळा दत्तक घ्याव्यात; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंसोबत चार तास बैठक संपन्न

मुंबई :

महाराष्ट्रातील शाळांचे आधुनिकीकरण करून शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण विभागाने आता ‘मिशन मोड’वर काम करावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईतील ‘नंदनवन’ या शासकीय निवास्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास चाललेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला.

कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश बैठकीत शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांची, योजनांची आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. शिक्षण मंत्रालयाकडून सुरू असलेल्या कामाची प्रशंसा करत शिंदे म्हणाले, “आपल्या मुलांच्या आकांक्षा आणि स्वप्ने बदलत आहेत, त्यानुसार आपल्या शाळाही बदलल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी सक्षम बनवणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण व भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक व कालबद्ध कृती आराखडा तयार करा.” या आराखड्यात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचा समावेश करणे, शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण देणे आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यावर भर दिला जाईल.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी; कॉर्पोरेट क्षेत्राचे घेणार सहकार्य “शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम आणि परीक्षा नसून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास हा व्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे,” असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यासाठी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पोषण, मध्यान्ह भोजन योजना आणि मानसिक आरोग्यासाठीचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शाळांच्या आधुनिक विकासासाठी उद्योग व कॉर्पोरेट क्षेत्राची मदत घेतली जाणार असून, लवकरच या क्षेत्रातील प्रमुखांशी बैठका घेऊन तंत्रज्ञान, कौशल्य व संसाधने मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.

आमदार-खासदार शाळा दत्तक घेणार; दर आठवड्याला होणार आढावा आपल्या मतदारसंघातील शाळांच्या दर्जा वाढीसाठी आमदार आणि खासदारांनी शाळा दत्तक घेऊन योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळांच्या विकासात पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक समाजाची सक्रिय भागीदारी वाढवली जाईल. तसेच या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा दर आठवड्याला आढावा घेतला जाईल. “शाळा बदलल्या तर विद्यार्थ्यांचे भविष्य बदलेल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य बदलले तर महाराष्ट्राचे भविष्य बदलेल,” असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 24-08-2026