साखरेच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त; महसूल वाढवण्यासाठी दारूवर कर वाढवण्याची मागणी
बुलढाणा :
साखर दर वाढीच्या समस्येने संपूर्ण देशात आणि राज्यात सर्वसामान्य नागरिकांचे अर्थकारण कोलमडले आहे. ५० रुपये किलो मिळणारी साखर थेट ७० ते ८० रुपयांवर पोहोचल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अशातच साखरेची दरवाढ नियंत्रित करण्यासाठी आणि सामान्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक थेट पत्र लिहून अनोखी मागणी केली आहे. दारूच्या किमती तब्बल १० पटीने वाढवून त्यातून मिळणाऱ्या महसुलातून साखरेचे भाव निम्म्यावर आणावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
सणासुदीच्या दिवसांत साखरेचे भाव नियंत्रणात आणण्याचे आवाहन आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी हे मोठे सण येत असल्याने बाजारात साखरेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. सध्याच्या काळात वाढलेल्या साखरेच्या भावामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. राज्य सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी दारूवरील कर वाढवून महसूल वाढवावा आणि त्या माध्यमातून साखरेचे दर त्वरित अर्ध्यावर आणावेत, असा सल्ला सावजी यांनी पत्रात दिला आहे. यासोबतच, “शासनाच्या कोणत्याही निर्णयाविरोधात सामान्य जनता आंदोलनास उतरत नाही, कारण त्यांच्यावर पोलीस केसेस होतात; त्यामुळे आपण करता ते सर्वच योग्य आहे असे नाही,” असा खोचक टोलाही त्यांनी प्रशासनाला लगावला आहे.
साखरेच्या तुटवड्यामुळे दरांनी ओलांडली विक्रमी पातळी साखरेच्या दराने इतिहासातील विक्रमी पातळी गाठली असली, तरी या भाववाढीचा प्रत्यक्ष फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कारखान्यांकडील साठ्याची कमतरता आणि २०२५-२६ च्या वर्षात उत्पादनापेक्षा झालेला अधिक वापर, हे साखरेच्या दरातील वाढीचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय केंद्र सरकारने उत्पादनाच्या अंदाजानुसार दिलेली निर्यात परवानगी आणि प्रत्यक्षात झालेली निर्यात यामुळेही देशांतर्गत बाजारात साठा कमी पडला आहे. या तुटवड्यावर मात करण्यासाठी सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेची आयात करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे दर नियंत्रणात येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 24-08-2026














