Maharashtra Rain: राज्यात पावसाचे पुनरागमन.. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

नागपूर :

संपूर्ण राज्याला प्रतीक्षा लावून धरल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपला मोर्चा वळवला आहे. बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत येलो अलर्ट जारी केला असून, उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात काल रात्रभर रिपरिप सुरू होती, तर आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गोंदियात पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याने हवामान विभागाने येथे ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. सततच्या या पावसामुळे गोंदियातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून हे पाणी धान पिकासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

२६ ते २८ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता दीर्घ प्रतीक्षेनंतर नागपूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने तापमानाचा पारा ५ अंश सेल्सिअसने घसरला असून नागपुरात सध्या १३.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २६ ते २८ ऑगस्ट या कालावधीत विदर्भातील बहुतांश भागांत चांगल्या व मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळतील.

यवतमाळमध्ये ३६ हजार हेक्टरवर नुकसान; ३२ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ५३५ गावांतील ४१ हजार ५५६ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ३६ हजार १३५ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर आणि बागायती पिके पाण्याखाली गेली आहेत. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने ३१ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीची मागणी करणारा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला आहे. दुबार पेरणी, बोगस बियाणे आणि आता अतिवृष्टी अशा संकटांच्या मालिकेमुळे बळीराजा मेटाकुटीला आला असून शासकीय मदतीकडे डोळे लावून बसला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 24-08-2026