“एमपीएससीचा पेपर फुटूनही प्रकरण दाबले जातेय, मुख्य संशयित गुजरातमध्ये फरार”; राहुल गांधींसमोर गंभीर आरोप
पुणे : प्रतिनिधी
पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील गोंधळ आणि पेपरफुटीचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे. “एमपीएससी ही एक घटनात्मक संस्था असूनही मार्च महिन्यात झालेला पेपर फुटल्याचे प्रकरण प्रशासनाकडून दाबले जात आहे,” असा खळबळजनक आरोप फार्मासिस्ट शरयू चोपडे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासमोर केला. एमपीएससीचा हा घोटाळा दाबला जात असून विद्यार्थ्यांना न्याय, पारदर्शकता आणि त्वरित फेरपरीक्षा हवी आहे, अशी आक्रमक भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.
२० मार्चचा पेपर फुटला; सीआयडीकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? आपली व्यथा मांडताना शरयू चोपडे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन पुण्यात येतात. २० ते २२ मार्च दरम्यान झालेली आमची परीक्षा आणि त्यातील २० मार्चचा पेपर आधीच फुटला होता. सुरुवातीला एमपीएससीने हा प्रकार पूर्णपणे नाकारला. आम्ही एफडीए (FDA) आयुक्त आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांची वैयक्तिक भेट घेऊन पुरावे सादर केल्यानंतर आणि प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल झाली. आता हा तपास सीआयडीकडे (CID) गेला असून अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येत असतानाही हे प्रकरण जाणीवपूर्वक दाबले जात आहे.”
“मुख्य आरोपी गुजरातमध्ये फरार, आम्हाला फेरपरीक्षाच हवी!” विद्यार्थिनींवरील सामाजिक आणि कौटुंबिक दबावावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “महिला उमेदवार म्हणून आमच्यावर लग्नाचा आणि कुटुंबाचा मोठा दबाव असतो. अशा प्रकारच्या पेपरफुटीमुळे आमचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सध्या गुजरातमध्ये पळून गेला असून तो फरार आहे. आमच्याकडे याचे सर्व स्क्रीनशॉट्स आणि पुरावे उपलब्ध आहेत.” एकामागून एक पेपर फुटत असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा झाला असून राहुल गांधी यांनी याविरोधात आवाज उठवून फेरपरीक्षा घेण्यास सरकारला भाग पाडावे, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली.
राहुल गांधींकडून सकारात्मक प्रतिसाद विद्यार्थ्यांची ही गंभीर समस्या ऐकल्यानंतर राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्याचे आश्वासन दिले. “या प्रकरणात सर्व पुराव्यांची पाहणी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि पारदर्शक परीक्षेसाठी नक्की कशी मदत करता येईल, यावर आपण एकत्रित मार्ग काढू,” असे आश्वासन राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 24-08-2026














