Devendra Fadnavis Gen Z Dialogue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘जेन झी’शी संवाद: “लोकशाहीची ताकद हीच, जिथे कोणताही तरुण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनू शकतो”

“राजकारण हे माझ्यासाठी सामाजिक-आर्थिक बदलाचे मिशन”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला १८ व्या वर्षी कारगृहात गेल्याचा किस्सा

नागपूर :

“भारताच्या संविधानाने आणि लोकशाहीने आपल्या तरुणांना अशी ताकद दिली आहे की, मनात पक्के ठरवले तर या देशातील कोणताही तरुण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनू शकतो,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर येथे आयोजित ‘मंथन फॉर युवा’ (Manthan For Yuva) या कार्यक्रमात ‘जेन झी’ (Gen Z) तरुणांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनेक जुने किस्से उलगडले.

“मी विरोधी पक्षात राहण्यासाठीच जन्माला आलोय असे वाटायचे” तरुणांनी विचारलेल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जो देवेंद्र फडणवीस कधी नगरसेवक बनेल असा विचारही करत नव्हता, तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचला. गुजरातच्या रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान बनला, ही संविधानाची ताकद आहे. मी जेव्हा राजकारणात आलो, तेव्हा विचारांनी प्रेरित होऊन आलो होतो. आम्ही रोज आंदोलने करायचो, रोज लढाया लढायचो; कधी वाटलेही नव्हते की सत्ता येईल. पण जनतेने विश्वास दाखवला आणि पायरी-पायरी चढत मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली.”

लाल चौक आणि अयोध्येचे आंदोलन: असा हाताळला दबाव राजकारणातील आणि जबाबदाऱ्यांचा दबाव कसा हाताळता, यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या तरुण वयातील आंदोलनांचे किस्से सांगितले. ते म्हणाले, “राजकारण हा माझ्यासाठी व्यवसाय नसून सामाजिक आणि आर्थिक बदलांचे सर्वात मोठे माध्यम (मिशन) आहे. मी १८ वर्षांचा असताना अभाविपच्या (ABVP) माध्यमातून श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी गेलो होतो. उधमपूरला आम्हाला रोखल्यावर चालत गेलो, तिथे लष्कराने अटक केली. पुढे १९९२ मध्ये मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही लाल चौकात तिरंगा फडकवला.”

“तसेच, वयाच्या २० व्या वर्षी रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान मी अयोध्येला गेलो होतो. तिथे गोळीबार अनुभवला आणि बदायूं येथील सेंट्रल जेलमध्ये १८ दिवस काढले. १९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडला गेला तेव्हाही मी तिथे उपस्थित होतो. ज्याची राजकारणातील सुरुवातच अशा संघर्षातून आणि आंदोलनातून झाली असेल, त्याला दबाव हाताळणे सहज जमून जाते,” असे फडणवीस यांनी नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 24-08-2026