Guhagar Power Supply: गुहागरमध्ये १५ गावांचा वीजपुरवठा सुरळीत; महावितरणच्या कर्मचाऱ्यांची तत्परता

आबलोली उपकेंद्राच्या ११ केव्ही लाईनवरील बिघाड ५ तासांत दुरुस्त; ४ हजार ५०० ग्राहकांना दिलासा

गुहागर :

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील होमाच्या मैदानातील ठिकाणी आबलोली उपकेंद्रावरून निघणाऱ्या ११ केव्ही लाईनच्या पोलवर असणारा व्ही क्रॉस आणि वायर तुटल्याची घटना घडली. यामुळे आबलोली उपकेंद्र येथून निघणारी ११ केव्ही पडवे फिडर लाईनवरील १५ गावे सलग ५ तास अंधारात होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सूत्रे हलवत अंधाऱ्या रात्री अविरत मेहनत घेऊन हा वीजपुरवठा पूर्ववत केला.

अंधाऱ्या रात्री ५ तास सलग काम या घटनेची माहिती मिळताच महावितरण आबलोलीचे शाखा अभियंता सुजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे प्रकाश दूत प्रशांत कदम, संजय आग्रे, विशाल भोसले, प्रसाद शिगवण, अनिकेत जाधव, शैलेश वेलुंडे आणि सागर चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. या कर्मचाऱ्यांनी अंधाऱ्या रात्री तब्बल ५ तास अथक मेहनत घेऊन ११ केव्ही लाईनवरील बिघाड दुरुस्त केला.

४ हजार ५०० ग्राहकांना दिलासा; ग्रामस्थांचे सहकार्य कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे १५ गावे पुन्हा एकदा उजेडात आली असून परिसरातील ४ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला आहे. ही दुरुस्ती मोहीम फत्ते करण्यासाठी आबलोली येथील स्थानिक ग्रामस्थांनीही महावितरणच्या पथकाला विशेष सहकार्य आणि मदत केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 24-08-2026