संगणकीय छाननी सुरू
रत्नागिरी :
राज्य शासनाकडून लागू करण्यात आलेल्या ‘मिशन सुधार अभियाना’अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांची कडक छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान अनेक अपात्र व्यक्ती शासकीय रेशन धान्याचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३७ हजार ४०० अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून (रेशनकार्ड) कमी करण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा विभागाने वेगाने हाती घेतली आहे.
अभियानाचा मुख्य उद्देश आणि संगणकीय तपासणी सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, शासकीय धान्याचा काळाबाजार रोखणे आणि खऱ्या गरजूंनाच या योजनेचा लाभ मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. याशिवाय मृत व्यक्ती, एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंद असलेले (दुबार) लाभार्थी आणि प्रत्यक्ष राहत्या पत्त्यावर उपलब्ध नसलेल्या संशयास्पद लाभार्थ्यांची नावे संगणकीय प्रणालीद्वारे शोधून ती वगळली जात आहेत. या कारवाईमुळे शासनाच्या धान्य वितरणावर होणाऱ्या विनाकारण आर्थिक खर्चाला मोठा आळा बसणार आहे.
पात्र लाभार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही तांत्रिक कारणांमुळे किंवा ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत अडचणी आलेल्या पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे. नाव किंवा पत्ता चुकीचा असणे अथवा संगणकीय त्रुटींमुळे कोणाचेही नाव थेट रद्द केले जाणार नाही. अशा लाभार्थ्यांना आवश्यक ती योग्य कागदपत्रे पुरवठा विभागाकडे सादर करून आपली पात्रता सिद्ध करण्याची आणि नाव कायम ठेवण्याची पूर्ण संधी दिली जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 24-08-2026














