रत्नागिरीतील बेपत्ता खलाशाचा मृतदेह देवगड खाडीत आढळला

‘एकदंत’ नौकेवरून बेपत्ता झाल्याची नोंदवली होती तक्रार; पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद

रत्नागिरी / देवगड : प्रतिनिधी

देवगड बंदरातील ‘एकदंत’ या मासेमारी नौकेवरून अचानक बेपत्ता झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील वासुदेव गणपत कांबळे (वय ५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी, रत्नागिरी; सध्या रा. देवगड बंदर) या खलाशाचा मृतदेह बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देवगड आणि गावखडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, देवगड पोलीस स्थानकात या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पहाटेच्या सुमारास झाले होते बेपत्ता पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड बंदरातील कैलास नारायण खांदारे यांच्या मालकीच्या ‘एकदंत’ या नौकेवर वासुदेव कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून खलाशी म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासोबत दशरथ बोराटे हेदेखील याच नौकेवर काम करत होते. शुक्रवारी रात्री कामावरून परतल्यानंतर सर्व खलाशी नेहमीप्रमाणे नौकेवरच झोपले होते. मात्र, शनिवारी पहाटेच्या सुमारास वासुदेव कांबळे हे नौकेवर दिसून आले नाहीत.

शोधमोहिमेदरम्यान खाडीत सापडला मृतदेह वासुदेव कांबळे नौकेवर न दिसल्याने सहकाऱ्यांनी नौका आणि संपूर्ण बंदर परिसरात त्यांची शोधशोध सुरू केली. मात्र त्यांचा कोणताही पत्ता न लागल्याने सहकारी दशरथ अशोक बोराटे (वय ३८, मूळ रा. गावखडी, रत्नागिरी) यांनी देवगड पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची अधिकृत तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून आणि स्थानिक मच्छीमारांकडून शोधमोहीम सुरू असतानाच, देवगड बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात कांबळे यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 24-08-2026