मराठा समाजात फूट पाडण्याचा नेत्यांचा डाव; सामान्य ओबीसींना विरोध मान्य नसल्याचा दावा
अंतरवाली सराटी : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम असून २९ ऑगस्ट २०२६ पासून ते पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज १२३ गावांतील प्रमुख मराठा बांधवांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आपल्या गाड्या बाहेर काढून आंतरवाली सराटीकडे येण्याचे आवाहन केले आहे.
“सामान्यांना विरोध मान्य नाही; नेत्यांचा स्वार्थी डाव”
जातीच्या भिंतींशी या लढ्याचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट करत मनोज जरांगे म्हणाले, “मराठ्यांच्या विरोधात जाणे किंवा आरक्षणाला विरोध करणे हे सामान्य ओबीसी बांधवांनाही मान्य नाही. ज्यांच्या वंशावळीच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना आरक्षण दिलेच पाहिजे अशीच प्रामाणिक भावना सामान्य ओबीसींची आहे. परंतु, काही राजकीय नेते केवळ स्वार्थासाठी गरीब ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात फिरवण्याचे काम करत आहेत.”
मायक्रो ओबीसींच्या मुद्द्यावरून सरकारवर सवाल
राजकारणी नेहमी ओबीसींच्या नावाने राजकारण करतात, असा आरोप करत त्यांनी काही सवाल उपस्थित केले:
- शिक्षणाचा अधिकार: कोणत्या मायक्रो ओबीसी समाजातील मुलांना नेटके शिक्षण मिळाले?
- नोकरी आणि राजकीय पदे: कोणत्या मायक्रो ओबीसीला नोकरीत अथवा राजकारणात योग्य जागा खाऊ दिल्या?
- हक्कांवर डल्ला: सर्व गरीब व लहानातिल लहान (मायक्रो) ओबीसींच्या हक्कांच्या जागा या बड्या नेत्यांनीच हडपल्या आहेत.
“ओबीसी आणि मराठा समाजात कोणताही वाद नाही. ओबीसी अडाणी वाटत असले तरी तो समाज अत्यंत हुशार आहे आणि कोणाचा काय हेतू आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे,” असेही ते म्हणाले.
“सरकारने डाव टाकला तर मराठेही डाव टाकणार”
मुंबईतील सर्व मराठा समाज एकवटला असून त्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिल्याचे जरांगे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या संभाव्य बैठकीबाबत विचारले असता, आपल्याला त्याबाबत माहिती नसून आंदोलनाची पुढची रणनीती ठरलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “सरकारने जर काही राजकीय डाव टाकला, तर मराठा समाजही त्याला चोख उत्तर देईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:20 24-08-2026














