रत्नागिरी: बसणी ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंदन बसणकर यांची सलग पाचव्या वर्षी बिनविरोध निवड

ग्रामसभेत उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल; सर्वपक्षीय ग्रामस्थांकडून मनःपूर्वक कौतुक आणि गौरव

रत्नागिरी:

रत्नागिरी तालुक्यातील बसणी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. चंदन रविंद्र बसणकर यांची सलग पाचव्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि निष्पक्ष सामाजिक कार्याची दखल घेत संपूर्ण ग्रामसभेने एकमुखाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना श्री. चंदन बसणकर म्हणाले, “निस्वार्थ समाजसेवा हेच माझ्या आयुष्याचे मुख्य ध्येय आहे. गावातील शांतता, सलोखा आणि बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” या वेळी त्यांनी आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, लोकप्रतिनिधींचे आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि गावातील तंटे आपापसात सामंजस्याने मिटवण्याच्या कौशल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान व गौरव करण्यात आला. श्री. बसणकर यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली ही समिती गावातील छोटे-मोठे वाद आणि तंटे न्यायाने सोडवून बसणी गावाला तंटामुक्त ठेवण्यात यापुढेही मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

या महत्त्वपूर्ण ग्रामसभेला बसणी गावच्या सरपंच सौ. समृद्धी मयेकर, उपसरपंच श्री. किशोर नेवरेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुमित राणे, श्री. बबन शिंदे, सौ. मानसी पाष्टे, पोलीस पाटील सौ. प्रिया बंदरकर, ग्रामसेवक, तसेच श्री. कदम गुरुजी, माजी डी.वाय.एस.पी. श्री. भोसले साहेब, श्री. अनिल मयेकर, श्री. प्रशांत बंदरकर, श्री. गौतम कदम, श्री. बबन राणे, श्री. अनंत मांडवकर आणि प्रमोद झगडे यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 26-08-2026