अपूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी २९ ऑगस्टपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
कुणबी वंशावळ जुळवणी समितीला ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ
कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या वंशावळ जुळवणी समितीला (Maratha Kunbi Genealogy Committees) शासनाने मुदतवाढ दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वंशावळ जुळवणीचे काम अद्याप अपूर्ण असल्याने १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या कालावधीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला असून, अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी या समितीची मुदत ३० जून २०२६ रोजी संपली होती.
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय
नुकत्याच पार पडलेल्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. वंशावळीची जुळवणी जलदगतीने व्हावी आणि पात्र नागरिकांना प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर व्हावा, हा या मुदतवाढीमागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा मनोज जरांगे यांना महत्त्वाचा सल्ला
दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी ५८ लाख नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्याची आणि सातारा, कोल्हापूर, दौंड, पुणे या भागांसाठी स्वतंत्र जी.आर. काढण्याची मागणी लावून धरली आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी जरांगे पाटील यांना नवीन सल्ला दिला आहे. “वारंवार नोंदी शोधण्यापेक्षा आणि उपोषणे करण्यापेक्षा जरांगे पाटील यांनी ओबीसींच्या उप-वर्गीकरणाची (OBC Sub-categorization) मागणी करावी,” असे राठोड म्हणाले. मराठ्यांना आरक्षणाच्या कायद्यानुसार ओबीसी घोषित केले असल्याने, उप-वर्गीकरण केल्यास सर्व मराठा समाजाला ओबीसी समकक्ष दर्जा मिळू शकेल आणि नोंदी तपासण्याची गरज उरणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 26-08-2026














