Mumbai-Goa Highway Accident: गणेशमूर्ती वाहून नेणाऱ्या टेम्पोला अपघात; मध्यरात्री भीषण दुर्घटना

एका महिलेची प्रकृती चिंताजनक

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे नाका परिसरातील वारकरी मठासमोर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कार आणि गणेशमूर्ती वाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये भीषण अपघात घडला. पेण येथून गणेशमूर्ती घेऊन साखरप्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला बदलापूरहून गणपतीपुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तीन प्रवासी जखमी झाले असून, टेम्पोतील गणेशमूर्तींचेही मोठे नुकसान झाले आहे.

धडकेची तीव्रता प्रचंड; जखमींवर तातडीने उपचार सुरू

अपघाताची धडक एवढी भीषण होती की, धडक बसल्यानंतर कारची दिशा बदलून ती थेट मुंबईच्या दिशेने फिरली, तर टेम्पो काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला. या दुर्घटनेत कारमधील रोहन बाळकृष्ण बाळसराफ, सोनल चव्हाण आणि कोमल शिरके हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना कारबाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

खेड पोलिसांकडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत; तपास सुरू

अपघाताचे वृत्त समजताच खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य हाती घेतले आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. टेम्पोमधून नेल्या जात असलेल्या गणेशमूर्तींचे अपघातात नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याचा सखोल तपास खेड पोलीस करत असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 26-08-2026