विधानसभेतील प्रश्नांच्या संख्येत ७२ टक्क्यांची घट; अमीन पटेल अव्वल, तर सत्ताधारी आमदार कामगिरीत पिछाडीवर
मुंबईतील आमदारांच्या विधानसभेतील कामगिरीसंदर्भातील प्रजा फाउंडेशनचा वार्षिक अहवाल (‘एमएलए रिपोर्ट कार्ड २०२६’) नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या अहवालानुसार, विधानसभेत आमदारांकडून नागरिकांच्या समस्यांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या संख्येत आणि गुणवत्तेत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीत मुंबईतील आमदारांनी केवळ २,२१३ प्रश्न विचारले असून, २००९-२०१० दरम्यान विचारलेल्या ७,९५५ प्रश्नांच्या तुलनेत यात तब्बल ७२ टक्क्यांची घसरण झाली आहे.
कामगिरीत विरोधी पक्षाचे आमदार अव्वल
प्रजा फाउंडेशनच्या प्रगतीपुस्तकानुसार, मुंबईतील प्रश्नांवर बोलण्यात आणि विधानसभेत ते मांडण्यात विरोधी पक्षांचे आमदार अधिक सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकांवर काँग्रेसचे तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार आहेत. पहिल्या पाच आमदारांमध्ये सत्ताधारी पक्षातील एकाही आमदाराचा समावेश नाही.
- टॉप ५ आमदार (सर्वोत्कृष्ट कामगिरी): १. अमीन पटेल (काँग्रेस) २. अस्लम शेख (काँग्रेस) ३. ज्योती गायकवाड (काँग्रेस) ४. सुनील प्रभू (शिवसेना – ठाकरे गट) ५. मनोज जामसुतकर (शिवसेना – ठाकरे गट)
सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची कामगिरी निराशाजनक
एकूण ३६ आमदारांच्या मूल्यमापनात सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींची कामगिरी तळाशी राहिली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे आमदार प्रकाश सुर्वे हे या यादीत शेवटच्या स्थानावर आहेत, तर आदित्य ठाकरे १८ व्या स्थानावर आहेत.
- तळातील ५ आमदार (निष्क्रीय कामगिरी): १. प्रकाश सुर्वे (शिवसेना – शिंदे गट) २. अशोक पाटील (शिवसेना – शिंदे गट) ३. राम कदम (भाजप) ४. दिलीप लांडे (शिवसेना – शिंदे गट) ५. कालिदास कोळंबकर (भाजप)
आमदारांचे गुण घसरले: मिलिंद म्हस्के
आमदारांच्या कामगिरीवर चिंता व्यक्त करताना प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के म्हणाले, “आमदारांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न खरोखरच विधानसभेत पोहोचतात का, हा आमच्या मूल्यमापनाचा मुख्य आधार होता. १२ व्या विधानसभेत आमदारांचे सरासरी गुण ६१ होते, ते १४ व्या विधानसभेत घसरून ५४ वर आले आणि १५ व्या विधानसभेत त्यात किंचित वाढ होऊन ते ५५ झाले आहेत. या घसरणीकडे केवळ चढउतार म्हणून न पाहता लोकप्रतिनिधींच्या दायित्वाचा विषय म्हणून पाहिले पाहिजे.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 26-08-2026














