सीएसएमटी ते मडगाव दरम्यान २ विशेष फेऱ्या; कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे
गणपती विशेष ट्रेन च्या माध्यमातून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने दिलासादायक बातमी दिली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव दरम्यान ४ विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्यांमुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१००७ विशेष ट्रेन दिनांक ११ सप्टेंबर २०२६ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री ००:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:३० वाजता मडगाव येथे पोहोचेल (एकूण २ सेवा). तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१००८ विशेष ट्रेन दिनांक ११ सप्टेंबर २०२६ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी मडगाव येथून सायंकाळी १६:३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:१५ वाजता पोहोचेल (एकूण २ सेवा).
या विशेष ट्रेनला कोकण मार्गावर दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या गाडीची रचना २ वातानुकूलित तृतीय (3AC), १२ शयनयान (Sleeper), ६ सामान्य द्वितीय श्रेणी (Unreserved General) आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी असणार आहे.
गाडी क्रमांक ०१००७ या गणपती आरक्षित विशेष ट्रेनसाठीचे आरक्षण उद्या, शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ पासून सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर (PRS) आणि आयआरसीटीसीच्या (www.irctc.co.in) अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी या विशेष ट्रेन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 28-08-2026














