जाणून घ्या हवामान विभागाचा विभागनिहाय अंदाज
महाराष्ट्र हवामान अंदाज वर्तवताना हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असून पुढील आठवडाभर विविध विभागांमध्ये पावसाची स्थिती वेगळी राहण्याची शक्यता आहे. कोकण पट्ट्यात पावसाची उपस्थिती कायम राहणार असली तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभागात २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू राहील. यामध्ये उत्तर कोकणात सुरुवातीच्या काळात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला, मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस केवळ काही ठिकाणीच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तेथे मोठ्या पावसाचा अंदाज नसल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत. तर मराठवाड्यातही केवळ तुरळक ठिकाणीच पावसाच्या सरी कोसळतील. मराठवाड्यातील पावसाची सध्या असणारी तूट भरून काढण्यासाठी आवश्यक असलेल्या जोरदार पावसाची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही.
विदर्भातील पावसाची स्थिती मात्र तुलनेने समाधानकारक आहे. विदर्भात २८ ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्यानंतरही काही भागांत पावसाची हजेरी राहील. तसेच २ सप्टेंबर रोजी विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 28-08-2026














