Lalya Khurkut Vaccination Ratnagiri: रत्नागिरीत लाळ्या-खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग; आतापर्यंत २० हजार पशूंचे लसीकरण पूर्ण

१ लाख ४६ हजार पशूंचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट; ४८ दिवस चालणाऱ्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

लाळ्या-खुरकूत लसीकरण रत्नागिरी जिल्ह्यात पशुधनाला संसर्गजन्य रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वेगाने राबवले जात असून, आतापर्यंत २० हजार पशूंचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १३ ऑगस्टपासून सुरू झालेली ही विशेष मोहीम एकूण ४८ दिवस चालणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनावरांना पायलाग अर्थात लाळ्या-खुरकूत प्रतिबंधक लस टोचून घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात लहान-मोठे मिळून सुमारे १ लाख ९६ हजार पशुधन आहे. त्यापैकी गायी, म्हशींसह १ लाख ४६ हजार पात्र जनावरांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागाने निश्चित केले आहे. लाळ्या-खुरकत हा विषाणूजन्य आणि वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगामुळे जनावरांच्या तोंडातून सतत लाळ गळणे, तोंड व जिभेवर फोड येणे, खुरांना जखमा होणे, लंगडणे, तीव्र ताप येणे आणि दूध उत्पादनात मोठी घट होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षातून दोन वेळा (पावसाळ्यापूर्वी आणि हिवाळ्यापूर्वी) ही लस दिली जाते. ४ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वासरांना आणि जनावरांना ही लस देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी किंवा पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.

जिल्ह्यातील पशुधनाचे लसीकरण निर्धारित उद्दिष्टानुसार वेळेत पूर्ण करण्यासाठी विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून, अधिकाधिक पशुधनाला सुरक्षित केले जाईल, असा विश्वास रत्नागिरी जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डी. के. झंझाड यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 28-08-2026