विजेत्या मंडळांना मिळणार ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपयांची पारितोषिके; उपक्रमाची प्रक्रिया सुरू
रत्नागिरी :
महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवंत आणि उत्कृष्ट मंडळांची पारदर्शक निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सात सदस्यीय जिल्हास्तरीय निवड समिती स्थापन करण्यात आली आहे.
सात सदस्यीय जिल्हास्तरीय समितीची रचना
जिल्हास्तरीय निवड समितीच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) असणार आहेत. या समितीत शासकीय आणि अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे:
- अध्यक्ष: उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)
- शासकीय सदस्य: पोलिस उपअधीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी
- अशासकीय सदस्य: समीर इंदुलकर, राहुल कळंबटे
- सदस्य सचिव: जिल्हा नियोजन अधिकारी
मूल्यांकन प्रक्रिया आणि निकष
तालुकास्तरावरून प्राप्त झालेले परीक्षण अहवाल, छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या निश्चित निकषांनुसार सर्व सहभागी मंडळांचे संगणकीय व वस्तुनिष्ठ गुणांकन केले जाईल. या गुणांकनाच्या आधारे पहिल्या तीन क्रमांकांच्या मंडळांची शिफारस समितीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल.
समान गुण मिळाल्यास प्राधान्य क्रमाबाबत विशेष नियम करण्यात आला आहे. दोन किंवा अधिक मंडळांना समान गुण मिळाल्यास, ज्या मंडळाची स्थापना अधिक वर्षांपूर्वी झाली आहे (म्हणजेच जुन्या मंडळाला) प्राधान्य दिले जाईल. या स्पर्धेत कोणतेही पारितोषिक विभागून दिले जाणार नाही.
पारितोषिकांचे स्वरूप
जिल्हा स्तरावर पहिल्या तीन क्रमांकांवर येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून रोख पारितोषिक देऊन गौरवले जाईल:
तृतीय क्रमांक: ३०,००० रुपये
प्रथम क्रमांक: ५०,००० रुपये
द्वितीय क्रमांक: ४०,००० रुपये
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 28-08-2026














