कोकण रेल्वे फुल्ल! खाजगी बसचे तिकीट ४ हजार रुपयांवर, चाकरमान्यांची मुंबईत धावपळ

प्रवाशांची कोंडी; गणेशोत्सवासाठी एसटी व खाजगी बसेसचाच पर्याय


मुंबई:
कोकण रेल्वे फुल्ल झाली असून, गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या मुंबई महानगर क्षेत्रातील चाकरमान्यांची प्रचंड धावपळ सुरू झाली आहे. रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण संपल्याने आता प्रवाशांसमोर एसटी आणि खाजगी बसेसशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. याच संधीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांची मोठी लूट सुरू केली आहे. एरवी १ हजार रुपये असणारे भाडे आता थेट १५०० ते साडेचार हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

कोकण रेल्वे फुल्ल: १३ लाख चाकरमानी गावी जाण्याच्या तयारीत
दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगर क्षेत्रातून सुमारे १३ लाख चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. यंदा मध्य रेल्वेने २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबरदरम्यान २०० विशेष आरक्षित व ६२ अनारक्षित फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम रेल्वे ७ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरदरम्यान ५४ आरक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. मुंबईतून सुटणाऱ्या या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये आतापर्यंत १,१३,००० प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले असून, पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमध्ये २,९०५ प्रवाशांनी बुकिंग केले आहे. या गणेशोत्सव हंगामात रेल्वेला तब्बल ७.७७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मात्र, सर्व गाड्या पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे अजूनही हजारो प्रवासी आरक्षणाअभावी ताटकळले आहेत.

गणेशोत्सवासाठी साडेतीन हजार खाजगी बसेस रडारवर
रेल्वे फुल्ल झाल्याने चाकरमान्यांनी खाजगी बसेसकडे मोर्चा वळवला आहे. दरवर्षी कोकणात सुमारे ३ हजार ते साडेतीन हजार खाजगी बसेस धावतात. नियमानुसार खाजगी ट्रॅव्हल्सना एसटी तिकीट दराच्या दीडपट दरवाढ करण्याची मंजुरी असते. मात्र, प्रत्यक्ष प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ट्रॅव्हल्स चालकांकडून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत भाडेवाढ करण्यात आली आहे.

१२ सप्टेंबरचे खाजगी बसचे भाडे (ट्रॅव्हल्स कंपनीनुसार दर कमी-जास्त):

मुंबई-सिंधुदुर्ग: ₹ २,००० ते ₹ ४,०००

मुंबई-कुडाळ: ₹ २,००० ते ₹ ३,५००

मुंबई-कणकवली: ₹ २,००० ते ₹ ४,०००

मुंबई-सावंतवाडी: ₹ ३,००० ते ₹ ४,५००

एसटी महामंडळाचा ५,२०० गाड्या चालवण्याचा निर्णय
खाजगी बसेसचे वाढते दर पाहता एसटी महामंडळाने यंदा ५,२०० गणपती स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ६१२ एसटी गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून, त्यात ३८७ गाड्यांचा समावेश ग्रुप बुकिंगमध्ये आहे. १२ आणि १३ सप्टेंबर रोजी गावी जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने त्यानुसार सर्वाधिक एसटी गाड्यांचे आरक्षण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 31-08-2026