Nashik Crime News: मुंबई उच्च न्यायालय भरती परीक्षेत बुटात मोबाईल लपवून हायटेक कॉपीचा प्रयत्न; नाशिकमध्ये परीक्षार्थीवर गुन्हा

एस.एम.आर.के. महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांनी पकडले रंगेहाथ; गुगलवर शोधत होता प्रश्नांची उत्तरे

मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदाच्या भरती परीक्षेदरम्यान नाशिकमध्ये हायटेक कॉपीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या कॉलेज रोडवरील एस.एम.आर.के. महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थीने चक्क आपल्या बुटात मोबाईल फोन लपवून परीक्षा कक्षात प्रवेश मिळवला. प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर मोबाईलच्या साहाय्याने गुगलवर प्रश्नांची उत्तरे शोधताना पर्यवेक्षकांनी त्याला रंगेहाथ पकडले.

अशा प्रकारे उघडकीस आला हायटेक प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, एस.एम.आर.के. महाविद्यालयात परीक्षा सुरू असताना नाशिकरोड येथील सह दिवाणी न्यायालयाचे सहायक अधीक्षक तुषार वडघुले आणि प्राध्यापक सौरभ देशपांडे हे पर्यवेक्षक म्हणून कर्तव्यावर होते. हॉल क्रमांक ११ मध्ये परीक्षा सुरू असताना ३० वर्षीय मनोज निवृत्ती वाघ या परीक्षार्थीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पर्यवेक्षकांनी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले. त्याची तपासणी केली असता, परीक्षा कक्षात मोबाईल नेण्यास बंदी असतानाही त्याने बुटात मोबाईल लपवून आणल्याचे उघड झाले.

Arihant 1

Nashik Crime News: गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर मनोज वाघ मोबाईलवर गुगलचा वापर करून प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत होता. पर्यवेक्षकांनी तत्काळ मोबाईल जप्त करून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी सहायक अधीक्षक तुषार वडघुले यांनी सरकारतर्फे २७ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात मनोज वाघ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 31-08-2026