Rotary Rain Run Ratnagiri च्या माध्यमातून ‘Say No to Drugs’ चा प्रभावी संदेश; अमली पदार्थ विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करणार, पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा
रत्नागिरी: Rotary Rain Run Ratnagiri अंतर्गत अंमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘रेन रन’ उपक्रमाचा आज रत्नागिरीत अत्यंत उत्साहात शुभारंभ झाला. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित या ‘Say No to Drugs’ या संकल्पनेवर आधारित सामाजिक उपक्रमाला उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रताप पुराणिक, उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.व्हाय.एस.पी.) अभिजीत थोरात, रोटरी कर्नाटक-गोवाचे डिस्ट्रक्ट गव्हर्नर इलेक्ट अशोक नाईक तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनिष नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर कोसळणाऱ्या पावसाच्या धारांमध्ये पार पडलेल्या या शर्यतीत एकूण ६८० धावपटू आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पावसात धावताना धावपटूंनी ‘Say No to Drugs’ चा प्रभावी संदेश देत व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी व्यापक जनजागृती केली. या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्यासोबतच युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प रोटरीच्या वतीने करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहीम अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबविण्यावर ठाम भर दिला. रत्नागिरी जिल्ह्यातून अंमली पदार्थांचे पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन कोणतीही हयगय करणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहाराशी संबंधित असलेल्या व्यक्तींना रत्नागिरी जिल्ह्यातून तडीपार करण्यासह त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत पालकमंत्र्यांनी या मोहिमेसाठी पोलीस प्रशासनाला सर्व आवश्यक सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही दिली. तसेच, युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन करत त्यांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमा दरम्यान पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही उपस्थितांना व्यसनमुक्त समाजनिर्मितीचे महत्त्व समजावून सांगितले. तरुण पिढी देशाचे भविष्य असल्याने युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रउभारणीत आणि स्वतःच्या आरोग्यासाठी सकारात्मक योगदान दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
या सामाजिक दौडीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यामध्ये रोटरी पीडीजी प्रताप पुराणिक, रोटरी कर्नाटक-गोवाचे डिस्ट्रक्ट गव्हर्नर इलेक्ट अशोक नाईक, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे रोटे. प्रणय तेली, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे रोटे. राजेश घटवाल, डॉ. संदीप करे तसेच असिस्टंट गव्हर्नर बिपीन गांधी यांचा समावेश होता. सर्व उपस्थितांनी धावपटूंचा उत्साह वाढवत अंमली पदार्थविरोधी चळवळीला पाठिंबा दर्शवला.
या उपक्रमाची यशस्वीता स्पष्ट करताना रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनिष नलावडे म्हणाले, “आजची ही धाव केवळ शारीरिक आरोग्यासाठीची धाव नव्हती; तर ती व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने रत्नागिरीकरांनी टाकलेले एक सकारात्मक पाऊल होते. पावसातही सहभागी झालेल्या प्रत्येक धावपटूने ‘Say No to Drugs’ हा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.”
या व्यापक रेन रनच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य प्रायोजक Physio-Bot, परेश साळवी, रत्नागिरी खबरदार टीम, रत्नशिल्प ज्वेल्स, श्रीकांत भुर्के, पोदार इंटरनॅशनल स्कूल ऑफ रत्नागिरी आणि Aim Fitness Team यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, आयोजन समिती, स्वयंसेवक, पोलीस प्रशासन, Physio-Bot टीम, भगवान सांबरे हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक आणि इतर सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था-व्यक्तींच्या अथक मेहनतीमुळे हा कार्यक्रम सुरळीत पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे सर्व सहभागी धावपटू, नागरिक, प्रायोजक व प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 31-08-2026















