Devrukh BSNL Office Theft: देवरूखमध्ये बीएसएनएल कार्यालयाचे कुलूप तोडून १४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल; टॉवरच्या कॉपर आणि ॲल्युमिनियम प्लेट्स चोरीला

देवरूख/संगमेश्वर: Devrukh BSNL Office Theft प्रकरणात संगमेश्वर येथील पैसाफंड हायस्कूलजवळ असलेल्या बीएसएनएल (BSNL) कार्यालयाचा मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत १४ हजार २५० रुपयांचा किमती मुद्देमाल लांबवल्याची घटना समोर आली आहे. ही चोरीची घटना २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ ते पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएल कंपनीत कनिष्ठ दूरसंचार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उमेश सदाशिव शिरसाट (रा. माभळे, ता. संगमेश्वर) हे २९ ऑगस्टच्या रात्री कार्यालयासमोर उड्डाणपुलाखाली झोपले होते. याच संधीचा गैरफायदा घेत चोरट्याने कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याने कार्यालयातील टॉवरच्या कॉपर व ॲल्युमिनियमच्या प्लेट्सची चोरी करून पोबारा केला. चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये ५ हजार २५० रुपये किमतीची (१५ किलो वजनाची, ३.५ फूट लांब व ४ इंच रुंद) १ कॉपर प्लेट, ८ हजार ४०० रुपये किमतीच्या लहान ४८ कॉपर प्लेट्स तसेच ६०० रुपये किमतीच्या ३ ॲल्युमिनियम प्लेट्स असा एकूण १४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.

या चोरीच्या घटनेप्रकरणी बीएसएनएल अधिकारी उमेश शिरसाट यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

tata motars

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:52 31-08-2026