जीर्ण विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीची महावितरणकडे मागणी
संगमेश्वर (रत्नागिरी):
संगमेश्वर उमरे एसटी बस अपघाताची एक थरारक घटना आज, बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फणसवणे नाका परिसरातील उमरे फाट्यावरील रामदास मिसळ स्टॉलजवळ घडली. संगमेश्वरहून उमरेकडे जाणाऱ्या चालत्या एसटी बसवर अचानक उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटून पडल्याने अपघात घडला. या घटनेत बसच्या वाहकाला विजेचा धक्का लागून किरकोळ दुखापत झाली, तर चालकाने दाखवलेले प्रसंगावधान आणि नशिबाची साथ यामुळे प्रवाशांसह चालकाचा बचाव झाला असून मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, एसटी महामंडळाची ‘एमएच २० बीएल २१४८’ क्रमांकाची बस सकाळी सात वाजता संगमेश्वर बसस्थानकातून उमरे गावाच्या दिशेने रवाना झाली होती. बस फणसवणे येथील उमरे फाट्यावर पोहोचली असता, रस्त्यालगत असलेल्या एका विद्युत खांबाच्या सपोर्टचा ताण अचानक तुटला. यामुळे चालू विद्युतप्रवाह असलेली तार थेट चालत्या बसच्या छतावर कोसळली.
विद्युतवाहिनी छतावर पडल्याचा क्षणार्धात अंदाज आल्यानंतर वाहक प्राजक्ता शिगवण यांना विजेचा जोरदार धक्का बसला. मात्र, अत्यंत प्रसंगावधान दाखवत त्यांनी त्वरित सीटचा आधार घेतला. सुदैवाने याच वेळी विद्युतप्रवाह खंडित झाल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आणि वाहक शिगवण या किरकोळ दुखापतीवर बचावल्या.
या अपघाताच्या वेळी बस चालक रवींद्र साप्ते हे चालकाच्या सीटवर अधांतरी स्थितीत (स्टीअरिंग आणि आसनाच्या विशिष्ट स्थितीत) असल्याने त्यांचा विजेच्या तारेसोबत थेट संपर्क आला नाही. त्यामुळे चालक साप्ते यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

घटनेच्या वेळी एसटी बसमध्ये केवळ एकच प्रवासी प्रवास करत होता. सदर प्रवासी आसनाला टेकून बसला होता आणि त्याच्या पायात चप्पल असल्याने त्याला विजेचा प्रवाह जाणवला नाही. सकाळी प्रवाशांची गर्दी नसणे आणि बसमध्ये एकच प्रवासी असणे, ही बाब सुदैवाची ठरली. जर बसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असती, तर या अपघाताचे स्वरूप गंभीर झाले असते.
घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून तातडीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधला. माहिती मिळताच लाईनमन होडे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ सुरक्षेचे उपाय योजून बसवर पडलेली विद्युत तार बाजूला केली आणि वाहतुकीचा मार्ग सुरक्षित केला.
दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील विविध ग्रामीण भागांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा असलेले अनेक विद्युत खांब आणि तारा अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. या घटनेमुळे संगमेश्वर परिसरातील वीज यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. महावितरण विभागाने तातडीने संपूर्ण परिसरातील जीर्ण खांब आणि विद्युत वाहिन्यांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 26-08-2026














