पुण्यातील कॉलेजमधून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याने वाद पेटला; अमित ठाकरेंवर गुन्हा, दोघांना अटक
मुंबई:- पुण्यातील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारी लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे कार्यकर्त्यांनी हटवला. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात तीव्र तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
‘शिवतीर्थ’ आणि माहिममध्ये गोंधळ अन् घोषणाबाजी
अमित ठाकरे यांच्या या कृतीचा निषेध करत भाजप युवा मोर्चाने राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानासमोर आंदोलनाची हाक दिली. यानंतर मनसे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शिवतीर्थाबाहेर जमा झाले. मनसे नेते संदीप देशपांडे, गजानन काळे आणि अविनाश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “भाजपने समोर यावे, आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ,” असा इशारा मनसे नेत्यांनी दिला.
दरम्यान, माहिम परिसरात भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक कार्यकर्त्यांसह दाखल झाले आणि त्यांनी अमित ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान मोदींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
शिवतीर्थाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त
दोन पक्षांचे कार्यकर्ते थेट एकमेकांशी भिडू नयेत आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी राज ठाकरे यांच्या घराकडे जाणारे रस्ते बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नेमके काय घडले होते?
अमित ठाकरे हे पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेले होते. मुख्याध्यापकांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो दिसताच “मोदींचा फोटो शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत कशाला?” असा सवाल अमित ठाकरेंनी विचारला. त्यानंतर मनसे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे यांनी तो फोटो तिथून हटवला. या घटनेनंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 01-09-2026














