पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘Rotary Rain Run’ चा शुभारंभ; ‘Say No to Drugs’ चा दिला संदेश
रत्नागिरी:- रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने ‘Rotary Rain Run – Say No to Drugs’ या विशेष उपक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. अंमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश जनमानसात पोहोचवणे, युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे या उद्देशाने आयोजित या मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीकरांसह मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथून आलेल्या धावपटूंनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ
उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘Rotary Rain Run’चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रताप पुराणिक, डी.वाय.एस.पी. अभिजीत थोरात, रोटरी कर्नाटक-गोवा डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर इलेक्ट अशोक नाईक तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनिष नलावडे यांच्यासह अनेक रोटरी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. मुसळधार पावसात धावताना सर्व धावपटूंनी ‘Say No to Drugs’ चा प्रभावी संदेश देऊन युवकांना व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन केले.
स्पर्धेतील विजेते धावपटू:
या रेन रनमध्ये ३ किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा दोन गटांत स्पर्धा पार पडली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खालील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला:
- ५ किलोमीटर गट:
- प्रथम: अमेय धुळप
- द्वितीय: स्वागत पाटील
- तृतीय: पंकज गोताड
- ३ किलोमीटर गट:
- प्रथम: राज पालवकर
- द्वितीय: पार्थ मयेकर
- तृतीय: सौरभ फुटक
प्रशासकीय अन् रोटरी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या सोहळ्याला रोटरी क्लब ऑफ कुडाळचे रोटे. प्रणय तेली, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे रोटे. राजेश घटवाल आणि असिस्टंट गव्हर्नर बिपीन गांधी यांच्यासह रोटरी पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे सर्व धावपटू, पोलीस प्रशासन, प्रायोजक आणि रत्नागिरीकर नागरिकांचे आभार मानण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 01-09-2026














