Radhakrishna Shree 2026 Bodybuilding Ratnagiri: चिमुकल्यांपासून युवा शरीरसौष्ठवपटूंचा थरार; गणेश गोसावी ठरला ‘राधाकृष्ण श्री-२०२६’चा महाविजेता!

सुहास फिटनेसच्या सोहम कुर्टेने पटकावला ‘मेन्स फिजिक्स’चा किताब; ८६ शरीरसौष्ठवपटूंची तुफान झुंज

रत्नागिरी:- गोकुळाष्टमीचे औचित्य साधून श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था व वैश्य युवा संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ‘राधाकृष्ण श्री-२०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत सह्याद्री कॉलेज जिम (सावर्डे-चिपळूण) च्या गणेश संजय गोसावी याने आपल्या उत्कृष्ट शरीरयष्टी आणि देखण्या सादरीकरणाच्या जोरावर ‘राधाकृष्ण श्री-२०२६’ या मानाच्या किताबावर आपले नाव कोरले.

यंदा प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘राधाकृष्ण श्री मेन्स फिजिक्स-२०२६’ स्पर्धेत सुहास फिटनेस (रत्नागिरी) च्या सोहम अनंत कुर्टे याने बाजी मारत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत दापोली, खेड, चिपळूण, सावर्डे, राजापूर व रत्नागिरीतील तब्बल ८६ शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेचा गटवार निकाल:

  • राधाकृष्ण श्री-२०२६ (गटनिहाय विजेते):
    • शॉर्ट ग्रुप: प्रथम – कहाफा कासम हुनेरकर (फिनिक्स हार्डकोअर जिम, रत्नागिरी)
    • मिडियम ग्रुप: प्रथम – रूपेश बंडू गोधडे (राजबिंडा फिटनेस, खेड)
    • टॉल ग्रुप: प्रथम – गणेश संजय गोसावी (सह्याद्री कॉलेज जिम, सावर्डे)
    • सुपर टॉल ग्रुप: प्रथम – सौरभ नरेश भोंगले (इलाईट जिम, रत्नागिरी)
  • राधाकृष्ण श्री मेन्स फिजिक्स-२०२६:
    • शॉर्ट ग्रुप (टायटल विनर): सोहम अनंत कुर्टे (सुहास फिटनेस, रत्नागिरी)
    • टॉल ग्रुप: दिशांत अच्युत कांबळे (क्रिडा संकुल, रत्नागिरी)

विशेष पुरस्कार:

  • राधाकृष्ण श्री-२०२६ (टायटल विनर): गणेश संजय गोसावी (सावर्डे, चिपळूण)
  • उगवता तारा (Rising Star): शार्दुल संजय टाकले (श्रीदेवी करंजेश्वरी जिम, चिपळूण)
  • बेस्ट पोझर (Best Poser): संजय शिवाजी डेरवणकर (इंडियन जिम, चिपळूण)

थाटात पार पडला बक्षीस वितरण सोहळा

स्पर्धेनंतर विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. ‘राधाकृष्ण श्री’ विजेता गणेश गोसावी याला श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे उपाध्यक्ष विरेंद्र शेठ वणजू व अभिज्ञ वणजू यांच्या हस्ते मानाचा पट्टा, आकर्षक शिल्ड आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. तर मेन्स फिजिक्स विजेता सोहम कुर्टे याला नगरसेवक केतन शेट्ये, सुयश शेट्ये व श्री. रेडिज यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद जोशी, सेक्रेटरी जितेंद्र नाचणकर, आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर नंदकुमार शिंदे, तसेच वैश्य युवा संस्थेचे वेदांग मलुष्टे, हर्षद रेडिज, कुंतल खातू, नरेंद्र वणजू यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम शेठ बाष्टे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 01-09-2026