१८ जिल्हे रेड झोनमध्ये, १४ जिल्ह्यांमध्ये जेमतेम; विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची मोठी तूट
मुंबई :
महाराष्ट्रात यंदाच्या मान्सून हंगामात १ जून ते ३० ऑगस्ट या ९० दिवसांच्या कालावधीत पावसाची सरासरी ११ टक्के तूट नोंदवली गेली आहे. अल-निनावाच्या प्रभावामुळे राज्यातील ३६ पैकी तब्बल ३२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यापैकी १८ जिल्हे अवर्षणग्रस्त म्हणजेच ‘रेड झोन’मध्ये गेले असून १४ जिल्ह्यांमध्ये जेमतेम पाऊस झाला आहे. केवळ चार जिल्ह्यांमध्येच मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
अतिवृष्टी आणि कमी पावसाचे जिल्हे
राज्यात नाशिक (५५ टक्के), सातारा (३९ टक्के), पुणे (३२ टक्के) आणि पालघर (२८ टक्के) या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची सर्वाधिक तूट पाहायला मिळत आहे. १ जून ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्रात ८०५.६ मि.मी. सरासरीच्या तुलनेत ७१६.४ मि.मी. पाऊस पडला आहे. यात कोकणात ९ टक्के तूट, मराठवाड्यात २९ टक्के तूट तर विदर्भात २५ टक्के तूट नोंदवली गेली आहे.
रेड झोन आणि तालुकानिहाय परिस्थिती
पावसाची उणीव २० ते उणी ५० टक्के असलेल्या अतिशय कमी पावसाच्या (रेड झोन) जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग (३४), अहिल्यानगर (२९), नंदुरबार (३९), सोलापूर (४६), बीड (४४), धाराशिव (३१), हिंगोली (४५), जालना (३८), लातूर (२६), नांदेड (२८), परभणी (३५), अकोला (३७), अमरावती (४८), चंद्रपूर (३३), गडचिरोली (२०), नागपूर (३५), वर्धा (२८) आणि वाशिम (३०) या १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय राज्यातील १४ तालुक्यांमध्ये अत्यंत अल्प, १३० तालुक्यांमध्ये खूप कमी, १३२ तालुक्यांमध्ये साधारण आणि ७९ तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:58 01-09-2026














