पेपर तपासणीतील पारदर्शकतेवर उठले प्रश्नचिन्ह; मराठी, इंग्रजी क्वालिफाईंग पेपरमध्येही शेकडो विद्यार्थी नापास
मुंबई:- औषध निरीक्षकपदाच्या पेपरफुटीमुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आयोगाने पहिल्यांदाच युपीएससीच्या (UPSC) धर्तीवर घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या (वर्णनात्मक/लेखी) निकालात गुणांची प्रचंड तफावत समोर आली आहे. मुख्य परीक्षेतील ऐच्छिक (Optional) विषयांमध्ये काही उमेदवारांना २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने पेपर तपासणीच्या पारदर्शकतेवर विद्यार्थ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ऑप्शनल विषयांच्या दोन्ही पेपर्समध्ये मोठी विषमता
एमपीएससीने जाहीर केलेल्या गुणांच्या पत्रकानुसार, ऐच्छिक विषयातील दोन पेपर्सच्या गुणांमध्ये अस्वाभाविक तफावत दिसून येत आहे:
- भूगोल: एका विद्यार्थ्याला भूगोल विषयाच्या पहिल्या पेपरमध्ये २५० पैकी १२१ गुण मिळाले आहेत, तर त्याच विषयाच्या दुसऱ्या पेपरमध्ये त्याला अवघे २ गुण देण्यात आले आहेत.
- फिलॉसॉफी व समाजशास्त्र: फिलॉसॉफी (तत्वज्ञान) विषयाच्या एका पेपरमध्ये विद्यार्थ्याला केवळ ६ गुण तर समाजशास्त्र (Sociology) विषयात एका विद्यार्थ्याला ११ गुण आणि दुसऱ्या एका विद्यार्थ्याला ६ गुण मिळाले आहेत.
- निबंध अन् जीएस: निबंधाच्या पेपरमध्ये काही विद्यार्थ्यांना १५० हून अधिक गुण मिळाले आहेत, तर काहींना अवघे १४ गुण देऊन गुंडाळण्यात आले आहे.
क्वालिफाईंग विषयातच अनेक गुणवंत बाद
इतर मुख्य विषयांमध्ये १०० हून अधिक गुण मिळवणाऱ्या अनेक हुशार विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी या अर्हता (Qualifying) पेपर्समध्ये ३०० पैकी आवश्यक असलेले ७५ गुणही देण्यात आलेले नाहीत. अवघ्या १ किंवा २ गुणांच्या फरकाने विद्यार्थी या भाषा पेपर्समध्ये नापास झाल्याने ते थेट मुलाखतींच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत.
पेपर तपासणी दरम्यान नक्की कोणते निकष लावले गेले आणि गुणांचे मॉडरेटर योग्य प्रकारे झाले का, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. एमपीएससीने या संपूर्ण प्रकाराची तात्काळ चौकशी करून उत्तरपत्रिकांचे फेरमूल्यांकन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:24 01-09-2026














