Chiplun Road Widening Project 2026: चिपळूण शहर रस्ता रुंदीकरणाला गती; उद्यापासून जागांचे मोजमाप व मूल्यमापन सुरू होणार

छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख आणि पाग पॉवर हाऊस मार्गाचा कायापालट; जागा मालकांना नोटिसा जारी

चिपळूण:- चिपळूण शहरातील अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख नाका आणि छत्रपती शिवाजी चौक ते पाग पॉवर हाऊस (स्वातंत्र्यवीर सावरकर चौक) या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या प्रक्रियेला चिपळूण नगरपरिषद प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रस्तावित रुंदीकरणामध्ये ताब्यात घेतल्या जाणाऱ्या जागांचे मोजमाप व मूल्यमापन करण्याचे काम बुधवार, २ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुरू केले जाणार आहे. या संदर्भात संबंधित बाधित जागा मालकांना नगरपरिषदेकडून आधीच नोटिसा बजावून सूचित करण्यात आले आहे.

‘स्मार्ट सिटी’च्या दृष्टीने नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा पुढाकार

चिपळूण शहराला ‘स्मार्ट सिटी’चे रूप देण्यासाठी आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते रुंद असणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पुढाकार घेत प्रशासनाकडून परिपूर्ण तांत्रिक अहवाल आणि नियोजन तयार करून घेतले. या महत्त्वाकांक्षी विकासकामासाठी आवश्यक असलेल्या निधीकरिता पालकमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून विशेष प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावांना राज्य शासनाकडून प्राथमिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता नगरपरिषदेने प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

जागांचे होणार रेखांकन आणि मोजमाप

यापूर्वी प्राथमिक स्तरावर रस्ता रुंदीकरणाची मोजमापे घेण्यात आली होती. त्यानुसार संबंधित जागा मालकांना दोन वेळा नोटिसा देऊन बाधित जागेबाबत आपली भूमिका मांडण्याचे व प्रशासनाकडून असणाऱ्या अपेक्षा कळवण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता प्रत्यक्ष अंमलबजावणीचे पहिले पाऊल उचलत प्रशासनाकडून २ सप्टेंबरपासून दोन्ही बाजूंनी आवश्यक असलेल्या जागांचे मोजमाप, मूल्यमापन आणि रेखांकन (मार्किंग) करण्याचे काम युद्धापातळीवर सुरू केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 01-09-2026