Amrut Vriksha App Registration: ‘अमृत वृक्ष’ ॲपवर वृक्षलागवडीची नोंद करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरी जिल्ह्याला ३५ लाख ७७ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट; सर्व शासकीय यंत्रणांनी ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन

रत्नागिरी: राज्यातील ३०० कोटी वृक्षारोपण मोहिमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला ३५ लाख ७७ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी आपापल्याला दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून लागवड केलेल्या वृक्षांची ‘अमृत वृक्ष’ ॲपवर अनिवार्यपणे ऑनलाइन नोंदणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.

जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विभागनिहाय उद्दिष्टांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी रणजीत गायकवाड यांनी विविध यंत्रणांना देण्यात आलेल्या वृक्षलागवडीच्या उद्दिष्टांची माहिती सादर केली.

स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना विशेष नियोजन करण्याच्या सूचना

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तहसीलदारांनी १० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अचूक नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या नागरी क्षेत्रात, शिक्षण विभागाने शाळांच्या परिसरात तर एमआयडीसीने औद्योगिक व कारखाना परिसरात व्यापक वृक्षलागवड करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:45 01-09-2026