खा. श्रीकांत शिंदे व खा. नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मंजुरीनंतर आजपासून सेवा सुरू
सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांसाठी आणि चाकरमान्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. या मार्गावर नियमित दैनिक एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या निरंतर पाठपुराव्याला यश आले असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कोकण रेल्वे मार्गावर या नव्या दैनंदिन एक्सप्रेस सेवेला हिरवा कंदील मिळाला आहे.
ही नवी दैनिक रेल्वे सेवा गुरुवार, ३ सप्टेंबरपासून नियमितपणे सुरू होत आहे. या सेवेचा औपचारिक शुभारंभ प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी १२.२० वाजता गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या नव्या एक्सप्रेसमुळे मुंबई ते दक्षिण कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
गाडी क्रमांक व प्रमुख स्थानकांवरील थांबे
या नवीन दैनंदिन एक्सप्रेस सेवेसाठी रेल्वे प्रशासनाकडून गाडी क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत. गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी ही ट्रेन नियमितपणे धावणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या ट्रेनला कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 03-09-2026














