गेल्या २४ तासांत ६८.३८ मिमी पावसाची नोंद; गुहागर, चिपळूण, संगमेश्वर आणि लांजात पावसाचा जोर अधिक
रत्नागिरी: ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले आहे. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दमदार पावसामुळे चिंतेत सापडलेल्या भात आणि नाचणी पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६८.३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात हवा तसा पाऊस न पडल्याने बहरलेली भात व नाचणीची पिके संकटात सापडली होती. पावसाच्या अभावामुळे भात पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या रात्री व सकाळी पावसाच्या सरी कोसळत असून दुपारी उन्हाचे दर्शन होत आहे. जिल्ह्यात गुहागर, चिपळूण, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यांत पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे.
पावसाची आकडेवारी व तुलनात्मक स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३,३६४ मिमी इतका पाऊस पडतो. यंदाच्या मोसमात गेल्या तीन महिन्यांत आतापर्यंत २,४६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३,२८४ मिमी पाऊस झाला होता. यंदा जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यांनी पावसाच्या बाबतीत मोठी निराशा केल्याने वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस अजूनही काहीसा मागे आहे. मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीला सुरू झालेल्या या दमदार पावसामुळे पिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 03-09-2026














