देवरूख पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
देवरूख, रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यातील देवरूख वरची आळी येथे राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ओंकार दत्तात्रय शिंदे (वय २८, रा. देवरूख वरची आळी) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे देवरूख शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकारने गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ओंकारने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर ओंकारच्या अकाली जाण्याने शिंदे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी आणि मुलगा असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 03-09-2026














