अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
दापोली, रत्नागिरी: दापोली तालुक्यातील मुगीज-कलमपेट येथे एका बंद घराचे कुलूप आणि कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत सुमारे ८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घरफोडीची घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजल्यापासून १ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी पांडुरंग भिकू झाटे यांचे घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडला. तसेच लगतच्या भिंतीतील स्लायडिंग खिडकी बाजूला सरकवून घरात प्रवेश केला.
कपाटाचे लॉकर उचकटले घरात शिरल्यानंतर चोरट्याने लोखंडी कपाट उचकटले आणि त्यातील लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेले तब्बल ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. १ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
झाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 03-09-2026














